नांदेड शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी; पतीच्या उदंड आयुष्यासाठी सुवासिनींचे साकडे
नवविवाहित सौभाग्यवतींच्या उत्साहाला उधाण !
नांदेड (प्रतिनिधी) : सवाष्ण स्त्रियांसाठी पवित्र असणारे, पतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधान देणारे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचे व्रत म्हणजे वटपोर्णिमा शनिवार (ता. ३ जून) रोजी नांदेड शहरात सुवासिनींनीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी शिवयोग, सिद्धी योग व तद्नंतर रवी योग असे तीन शुभ योग तयार झाल्याने सकाळपासूनच सुहासिनींमध्ये उत्साह संचारला होता. या मंगलमय शुभ काळाचे औचित्य साधून सुवासिनींनी पारंपारिक वस्त्रं, आभूषणे परिधान करून विधिवत पूजा करत देवतांचे आवाहन करून पंचामृत व जल अर्पण केले. तसेच हळदी-कुंकू, फुले-फळे अर्पण केली. यावेळी नैवेद्य दाखवून मनोभावे आरती करून प्रसादाचे वाटप केले.
ही ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ महिलांसह नवविवाहीत स्त्रियांना शृंगरासाठी पर्वणीच ठरली. या सणानिमित्त भाग्य नगर, नाईक नगर, आनंद नगर, श्री नगर, वजीराबाद, शिवाजी नगर, जुना मोंढा, नमस्कार चौक, चौफाळा, छत्रपती चौक, काबरा नगर, डी. मार्ट परिसर, भावसार चौक या भागांसह शहरातील अन्य परिसरांतील महिला दरवर्षीप्रमाणे नवीन साड्या, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, कपाळावर सिंदूर, सौभाग्याचं लेणं लेवून, अलंकार परिधान करून सजून-सवरून, सोळा शृंगार करून सोयीच्या ठिकाणी असलेल्या वडाच्या पारावर दाखल झाल्या. नवविवाहित सौभाग्यवतींनी धूप, कापूर अत्तर, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, गुळ, खोबर, दक्षिणा, नैवेद्य, पाच फळे, दुर्वादी साहित्यसह हळदी-कुंकू, अक्षता वाहून वडाच्या झाडाचे मनोभावे पूजा करत परिक्रमा केली. वडाच्या बुंध्याला सुताचे सात फेरे बांधत सावित्रीप्रमाणे ‘सात जन्मी हाच पती मिळू दे, माझे सौभाग्य अबाधित राहू दे’ अशी कामना केली. ज्येष्ठ महिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. मानाने मोठे असलेल्या सुहासिनींकडून हळदी-कुंकू लावून ओटी भरुन घेतली. सर्वच महिलांनी दिवसभर उपवास ठेवला.
नांदेड शहरातील अनेक मंदिरांमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासूनच महिलांची गर्दी होती. नाईक नगरातील महादेव मंदिराच्या प्रांगणात असलेल्या विस्तीर्ण वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ‘शारदा कन्स्ट्रक्शन्स’च्या रेणुका महादेव मोरगे, ग्लोबल कॉलेजच्या वैशाली अविनाश मारकोळे, राजश्री भरत पवार, सिंधुजा गुणवंत कवळे, आराधना शिवाप्पा पाटील आदी महिलांनी एकत्रित येऊन पर्यावरणीयदृष्ट्या वटवृक्षाचे विशेष महत्त्व नवीन पिढीला समजावून सांगितले आणि वटवृक्षाबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करत झाडाला कुठली इजा होऊ न देता पारंपारिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन केले. कडक उन्हात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधत महिलांनी वटवृक्षाची विधीवत पूजा केल्याने हा सण संस्कृतीची जपणूक करणारा ठरला.