स्नूकर खेळणाऱ्या १२ जणांवर कारवाई; १६ हजार रुपयांचा दंड वसूल

स्नूकर खेळणाऱ्या १२ जणांवर कारवाई; १६ हजार रुपयांचा दंड वसूल

स्नुकर पार्लरला ठोकले सील, शिवाजी नगर पोलीसांची कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केलेली असतानाही शहरातील सावेवाडी परिसरात ब्लॅक स्पॉट कॅफे नावाच्या पार्लरमध्ये स्नूकर खेळणाऱ्या १२ जणांवर मनपा व पोलिसांच्या वतीने कारवाई करत पार्लर चालक व स्नूकर खेळणाऱ्या १२ जणांकडून एकूण १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

शहरातील सावेवाडी परिसरात दिवाणजी मंगल कार्यालयाजवळ ब्लॅक स्पॉट कॅफे आहे. या कॅफेचे मालक प्रवीण माने यांनी बंदी असतानाही कॅफे सुरू ठेवलेला होता.१२ व्यक्ती तेथे स्नुकर खेळत होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर मनपाचे क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी तेथे छापा मारला. यावेळी १२ जण प्रत्यक्ष स्नूकर खेळत असल्याचे आढळून आले. या सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची अँटीजण चाचणी करण्यात आली. सर्वजण कोरोना निगेटिव्ह आढळले. स्नूकर खेळणाऱ्या १२ व्यक्तींना प्रत्येकी ५०० रुपये व कॅफेचालक प्रवीण माने यांच्याकडून १० हजार रुपये असा एकूण १६ हजार रुपयांचा दंड यावेळी वसूल करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपोअ हिंमत जाधव, उपविपोअ प्रिया पाटील व मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या आदेशावरून कारवाई करण्यात आली आहे.

About The Author