सर्वसामान्यांच्या पार्श्वभागावर दणदणीत काठी!! चांदीच आहे मटका, जुगार आणि दारू वाल्यांच्या ललाटी!!
उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तथा संसर्ग झालेल्या रुग्णापासून निरोगी माणसाला सुरक्षित ठेवण्याच्या कारणाने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कडक निर्बंध ही लावले जात आहेत. असे असले तरीही उदगीर शहर आणि ग्रामीण भागात मटका, गुटखा आणि अवैध दारू जोरदार चालू आहे. एका बाजूला हातावर पोट असलेले छोटे छोटे व्यवस्थाही बंद केले गेले आहेत. मात्र कल्याण, मुंबई, मिलन नावाचा मटका, गुटका अवैध देशी विदेशी दारू विक्री, हातभट्टी आणि ताडी यांच्यासोबतच महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू खुलेआम विकले जात आहेत.
गंमत म्हणजे बऱ्याच ठिकाणी या गुटका विक्रेत्या मार्फतच मटका देखील जोरात चालू आहे. मटका, गुटखा आणि दारू यांच्यावर या निर्बंधाचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. हे अवैद्य धंदे कसे चालू आहेत? हा भोळा भाबडा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. सकाळी अकरा वाजल्यानंतर एखादा व्यक्ती अत्यावश्यक कामानिमित्त जरी बाहेर पडली तर त्याला कारण विचारण्यापूर्वीच पार्श्वभागावर दोन-चार काठ्या खाव्या लागतात. मात्र या अवैद्य धंदेवाल्यांना खुलेआम सूट कशी? हाही प्रश्न जनसामान्यांच्या मनात पडलेला आहे. विशेष म्हणजे मोठ्या चौकात तसेच गल्लीबोळात तर कधी मोबाईल द्वारे हा मटका खेळाला व खेळविला जात आहे. याला भरीस भर म्हणजे गावाबाहेर जुगाराचे अड्डे ही राजरोसपणे चालू आहेत. संचारबंदी असल्यामुळे जुगारी लोक अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी दिलेली सूट असलेल्या वेळेत घरातून बाहेर पडून आपल्या अड्ड्यावर जाऊन बसत आहेत, आणि त्या ठिकाणी मग दिवसभर जुगार खेळून रात्रीच्या अंधारात कधीतरी घरी येत आहेत. काहीजण तर जुगार अड्ड्यावरच मुक्काम ही करत असल्याची चर्चा आहे.
मुंबई, कल्याण, मिलन नावाचा मटका, बंदी असलेला गुटका, जुगार आणि दारू बिनबोभाटपणे सुरू असून या गोष्टीकडे पोलीस प्रशासन का लक्ष घालत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील एका कर्मचाऱ्याला एका संपादकाने एका चौकात गुटखा आणि मटका चालू असल्याची माहिती दिल्यानंतर सदरील दुकाने बंद करण्याचे अधिकार नगरपालिकेला आहेत. तुम्ही नगरपालिकेला तक्रार करा. अशा पद्धतीची उद्धट आणि उर्मट भाषा ऐकायला मिळते! अर्थात अशा अवैध धंदे वाल्याकडून पोलीस प्रशासनाला अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून काही मदत दिली जात असावी अशी चर्चा आहे. पोलिस प्रशासनाच्या पाठबळाशिवाय अवैध धंदेवाल्यांची हिम्मत कशी होऊ शकेल? एका बाजूला उदगीर शहरात आणि परिसरात कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांचा आकडा ही वाढत आहे. अशा परिस्थितीत नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन जीव तोडून प्रयत्न करत असताना पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्याला कानाडोळा करून चालू देणे कितपत योग्य आहे? हे ही न सुटलेले कोडे आहे.
उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोणा बाधितांची संख्या वाढते आहे. इतकी गती दुसऱ्या कोणत्या तालुक्यात नाही, असे असतानांही साथरोग प्रतिबंध साठी सांगीतलेले नियम आणि महसूल प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवण्याची हिम्मत हे अवैध धंदे वाले कसे करू शकतात? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. उदगीर शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्रपणे दोन पोलीस स्टेशन असतानादेखील लॉक डाऊन च्या काळात अवैद्य धंदे चालतातच कसे? निश्चितपणे मोठ्या जोमात चालू असलेले हे अवैध दारू विक्री, मटका, गुटखा, जुगार हे पाहिले की पोलिस यंत्रणा कुठे कोमात? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्या अवैध धंद्याच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या विशेष पथकाकडून उदगीर शहर आणि ग्रामीण भागात धाडी टाकल्या गेल्या, मात्र शहर आणि ग्रामीण पोलीस गप्प का? या मागचे गौडबंगाल काय ?सर्वसामान्य माणूस बाहेर पडला की रस्त्यावर फिरणार्यांना काठीचा प्रसाद देणाऱ्या पोलिसांना हे अवैध दारू वाले, मटकेवाले, गुटकेवाले, जुगारवाले दिसत नाहीत का? असा सवाल नागरिकांना पडला आहे. समाजाच्या हितासाठी म्हणून काटेकोरपणे निर्बंध पाळले जाणे आणि जर हे निर्बंध पाळले जात नसतील तर सर्वांना समान न्याय या तत्त्वाने दंडात्मक कारवाई केली जावी. आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे! या भावनेतून कारवाई केली जाऊ नये. सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले जावे. अशी रास्त अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.