कोरोना काळातही सुटत नाही जुगाराचा नाद ! शिरूर आनंतपाळ पोलीसांनी जुगाऱ्यांना केले जेरबंद !!

कोरोना काळातही सुटत नाही जुगाराचा नाद ! शिरूर आनंतपाळ पोलीसांनी जुगाऱ्यांना केले जेरबंद !!

शिरूर आनंतपाळ ( प्रतिनिधी ) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. मृतांचा आकडा ही वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरीही काही हौशी जुगारी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जुगार खेळण्यात मशगुल झाले आहेत.

 गेल्या काही महिन्यांपासून शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशनचे सर्वच कर्मचारी सतर्क झाले असून अत्यंत काळजीपूर्वक आणि दक्षता घेत कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवणे आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यात अग्रेसर झाले आहेत. परिणामतः अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. असे असले तरीही गाव पुढाऱ्यांना आपल्या पुढारीपणाची एक वेगळीच खाज असते, आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही. अशी मग्रुरी अंगात भिनलेली असते. त्यामुळे “हम करे सो कायदा” असे वाटल्याने मनसोक्तपणे कायदे तोडून हे राजकारणी लोक वागू लागतात. इतर वेळेस प्रशासनाकडून अशा गोष्टीकडे दुर्लक्ष होत असले तरी सध्या साथ रोगनियंत्रणाच्या अनुषंगाने कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शिरूर अनंतपाळ पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शिरूर आनंतपाळ तालुक्यातील हालकी येथील ज्ञानोबा गुरमे यांच्या शेतात काही लोक तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळत आहेत.

ही माहिती हाती येताच जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर आनंतपाळ पोलिसांनी हलकी येथील ज्ञानोबा गुरमे यांच्या शेतात धाड टाकली.  त्या ठिकाणी पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले. लगेच या पथकाने कारवाई करून आरोपीताच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 88 /21 कलम 188 भादवी आणि 12 (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक लतीफ पाशामिंया सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी पांडुरंग सूर्यवंशी, नागोराव रामराव सारंगे, धोंडीराम यादवराव ढोक, सौदागर दामोदर बेवनाळे, गोविंद चंद्रकांतसिंह गहेरवार, संतोष लक्ष्मणसिंह गहेरेवार, चंदर मुरहरी भोसले, वामन राम पारगावे सर्व रा. हालकी ता. शिरूर आनंतपाळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.  तीन आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका एम एन कच्छवे हे करत आहेत.

या धाड सत्रात तीन लाखाहून अधिक रुपयाचा ऐवज शिरूर आनंतपाळ पोलिसांनी जप्त केला आहे यामध्ये जुगार खेळण्यासाठी लावलेले पैसे मोटारसायकल इत्यादींचा समावेश आहे या मोठ्या धाडसत्र मुळे जिल्ह्यातील जुगारी लोक चांगलेच हादरले आहेत.

About The Author