‘ब्रेक द चेन चा” फज्जा; नागरिकांची बाजारपेठेत ‘फुल्ल टू’ गर्दी
अहमदपूर ( गोविंद काळे) : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, वेळेवर ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने गेल्या पंधरा दिवसात अनेक तरुणांचा व वयोवृध्दांचा मृत्यूही झाला आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून पुकारण्यात आलेल्या १५ दिवसांच्या ब्रेक द चेन चा अहमदपूर शहरात बाजारात फज्जा उडाल्याचे चित्र असून, शासनाने जाहीर केलेल्या कठोर निर्बंधानाही बेजबाबदार नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे.
भाजीपाला आणि आंबे खरेदीसाठी बाजारपेठेसह चाळीस फूटी रस्त्यावरील दैनंदिन भाजीपाला बाजारात नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. अक्षरशः कोरोनाचे सर्व नियम पायंदळी तुडवत नागरिकांनी बाजारपेठेत ‘फुल्ल टू’ गर्दी केली असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत असल्याने एकप्रकारे कोरोनाला आमंत्रणच दिले जात आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू असून तालुक्यात दररोज सरासरी १५० हून अधिक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. या व्यतिरिक्त अनेक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. वेळेवर ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने गेल्या पंधरा दिवसात शहरातील अनेक तरुणांचा व वयोवृध्दांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. १५ एप्रिल ते १ मेपर्यंत १५ दिवस राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर करताना सकाळी ७ ते ११ या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, सध्या आंब्यांचा सीझन असल्याने आंबे, भाजीपाला व किराणा खरेदीसाठी शहरातील आझाद चौक, भाजी मार्केट ते मेन रोड, शिवाजी चौक, कॉलेज रोड बस स्थानकासमोर साठ फूटी रस्त्यावर आठवडी बाजारासोबतच दैनंदिन भाजीपाला बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची दररोज मोठी गर्दी उसळत आहे. मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असली तरी दररोज लहान-मोठी वाहने घेऊन नागरिक बिनदिक्कतपणे शहरातील गल्लीबोळात ये-जा करीत आहेत.
बाजार तसेच रोज भरणारा बाजार व त्यामुळे रोजची होणारी गर्दी पाहता महसुल प्रशासनाने दुपारी 2 वा व्यापारी यांची बैठक घेऊन नगरपालिकेने जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात भरत असलेले भाजी मार्केट बंद केले ते पुन्हा स्थलांतर करणे बाबत प्रशासन ने निर्णय घेतला व उद्या सकाळी 6.00 वाजे पासून महसूल पोलीस न प प्रशासन बाजातात गर्दी होण्याआधी सतर्क राहून कारवाई करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
आरोग्य प्रशासन ,पोलिस प्रशासन, नगरपालीका प्रशासन व महसुल प्रशासनाच्या वतीने शहरात विनाकारण फिरणार्या नागरिकांवर वेळोवेळी कारवाई करून त्यांच्या रॅपिड अॅंटीजेन टेस्टही केल्या. मात्र, तरीही शासनाचे नियम डावलून तालुकावासीय व शहरवासीय बिनधास्तपणे शहरात विनाकारण फिरून कोरोना संसर्गाला आमंत्रण देत आहेत.
विनामास्क आणि विनाकारण फिरणारे सुपर स्प्रेडर
शहरात अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत. दैनंदिन भाजीपाला बाजार असो की शहरातील मुख्य रोड असोत अशा विविध ठिकाणी विक्रेते दाटीवाटीने बसलेले असतात. किराणा दुकान, फळांची दुकाने, बँका आणि इतर ठिकाणी सुद्धा नागरिक सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत असून, कोरोनाचे सर्व नियम पायंदळी तुडवत शासनाच्या आदेशांची पायमल्ली करताना दिसत आहे. अहमदपूर तालुक्यात सध्या अधिकृतरित्या ११०० सक्रिय रुग्ण असले तरी ग्रामीण व शहरी भागातील कोविडची लक्षणे असलेले अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात कोणत्याही तपासण्या न करता तात्पुरते उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण मेडिकल दुकानातून तात्पुरत्या गोळ्या औषधे घेऊन घरीच उपचार घेत असल्याने ते इतर कुटुंबियांनाही बाधित करत असल्याचे दिसून आले आहे. हे रुग्ण दररोज शहरातील विविध दुकाने, भाजीबाजार, कार्यालये, बँका आदि ठिकाणी बिनधास्तपणे फिरून कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे कडक निर्बंध असतांनाही हेच नागरिक सुपर स्प्रेडर ठरत असल्याने तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार, वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन आणि महसूल विभाग आपले कर्तव्य चोख बजावत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबत अहमदपूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. भविष्यात कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे तसेच शहरातील भाजीपाला खरेदीसाठीची गर्दी पाहता पोलीस प्रशासन, नगरपालीका प्रशासन तसेच भाजीपाला विक्रेते यांची बैठक घेऊन शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे. – तहसिलदार प्रसाद कुलकर्णी