७ लाख ८७ हजार ३५९ रुपयांचा गांज्या जप्त

७ लाख ८७ हजार ३५९ रुपयांचा गांज्या जप्त

उमरगा (प्रतिनिधी) : कोविड नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून, उमरगा तालुक्यात तलमोड, कसगी व कवठा या तीन ठिकाणी २४ तास नाकाबंदी सुरू आहे. सोमवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास एका वाहनात गांजा आढळून आला आहे.

उमरगा तालुक्यात तलमोड, कसगी, कवठा येथे सीमा तपासणी पथक २४ तास तैनात आहे. सोमवारी पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी सीमा पोस्ट येथे भेट देवून पोलिस अंमलदारांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. दरम्यान, तलमोड सीमेवर पोलिस कर्मचारी एस. एम. उंबरे, एस एम घुले यांच्यासह होमगार्ड राठोड नाकाबंदी करत होते. यांनी बंद बॉडी ट्रकची (एमएच १४ एचजी ६५१५) तपासणी केली. त्यात चार प्लास्टिक गोण्यात ७८.७३५ किलो गांजा आढळला. त्याची अंदाजे किंमत सात लाख ८७ हजार ३५९ रुपये व वाहनांची तीन लाख आहे. असे एकूण दहा लाख ९२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक प्रकाश नरेंद्र बेहेरा (रा. शिरोळी, जिल्हा पुणे) यास पोलिस पथकाने ताब्यात घेतले. दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय मुकुंद अघाव, एपीआय सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक ए. टी. मालुसरे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

About The Author