लाॅकडावून मुळे लघुउद्योजक आर्थिक अडचणीत ! 

लाॅकडावून मुळे लघुउद्योजक आर्थिक अडचणीत ! 

आई जेवायला देत नाही, बाप भिक मागु देत नाही अशी कामगारांची स्थिती!!

 पुणे (रफिक शेख) : करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. या टाळेबंदीतून अत्यावश्यक सेवा आणि उद्योगांना वगळण्यात आले असून त्यानुसार पिंपरी, भोसरी आणि चाकण परिसरातील उद्योग सुरू आहेत. 

मात्र, कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने सरकारच्या आदेशामुळे बंद असल्याने कारखानदारांना कच्चा माल मिळत नसल्याची परिस्थिती आहे.  त्याचा फटका मोठय़ा कारखान्यांसह लघुउद्योजकांना बसला असून उत्पादनांना मागणी असूनही पाचशेहून अधिक लघुउद्योग बंद आहेत.तसेच दीड हजार कोटींहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि परिसरामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त लघुद्योग आहेत. यामध्ये सुमारे पाच लाख कामगारांना रोजगार मिळतो. 

राज्यातील उद्योग सुरू रहावेत, कामगारांचा रोजगार बुडू नये,  त्यांचा संसाराचा गाडा चालावा यासाठी सरकारने लघुउद्योगांना टाळेबंदीतून वगळले आहे. त्यामुळे उद्योग सुरू आहेत.

 मात्र, सरकारने लघुउद्योगांना कच्चा माल पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली नाही.  मोठय़ा कारखान्यांकडून काही प्रमाणात उत्पादनांची मागणी केली जात असली तरी कारखानदारांना आणिलघुउद्योजकांना कच्चा माल मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

करोना रुग्णांना प्राणवायू पुरवठा कमी पडत असल्याने प्राणवायूवर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांना प्राणवायू देण्यास सरकारने बंधने घातले आहे. त्यामुळे ते कारखाने बंद आहेत, त्यांची संख्याही मोठी आहे. गतवर्षीच्या टाळेबंदीमुळे कर्जबाजारी झालेले कारखानदार यंदाही मेटाकुटीला आले आहेत.  अनेक कारखान्यांना मोठय़ा उद्योगांकडून उत्पादनाची मागणी होत नसल्याने कामगारांच्या हाताला काम नाही.कामगारांच्या हाताला काम नाही,खिशात दाम नाही!अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

About The Author