महापुरुषांच्या मृत्यूनंतर… ते आजही जिवंत वाटत आहेत… – डॉ.अकबर लाला

महापुरुषांच्या मृत्यूनंतर… ते आजही जिवंत वाटत आहेत… - डॉ.अकबर लाला

अहमदपूर, ( गोविंद काळे) : आज माणसा माणसांमध्ये अप्रत्यक्ष द्वेषाचे वातावरण आहे. माणुसकी संपत चाललीय. कोणी जात, कोणी धर्म, कोणी भाषा, तर कोणी प्रांत पुढे करून आपापसांमध्ये लढताहेत. अशा वातावरणात महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने का होईना त्यांचे विचार आत्मसात करून अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यातून पूर्वीचे हे महापुरुष मेल्यानंतर आजही जिवंतच आहेत असे वाटायला लागली आहेत. तर आताचे पुढारी जिवंत असूनही आज मेल्या सारखे आहेत असे शिराढोण येथील खाजा नसरुद्दीन महाविद्यालयातील प्रसिद्ध कवी प्रा. डॉ.अकबर लाला यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक तथा ललित लेखक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. अकबर लाला म्हणाले की, महापुरुषांचे विचार आत्मसात करून आचरणात आणणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने माणुसकी जिवंत राहील आणि राष्ट्रप्रेम, बंधूभाव, सामाजिक दायित्व आदींची जोपासना मनुष्य करेल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी प्रसंगी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले व सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटील यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. प्रकाश चौकटे, प्रा. ग्रंथपाल परमेश्वर इंगळे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी संख्येने उपस्थित होते.

About The Author