रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
लातूर (प्रतिनिधी) : रस्त्यावर पडणारे पावसाच्या पाण्यापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. यापुढे रस्त्यांची कामे करताना हा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यापूर्वी विभागातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित औरंगाबाद आणि नांदेड सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या बैठकीत चव्हाण बोलत होते. औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, नांदेड सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, उस्मानाबाद मंडळाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक अभियंता विवेक बडे, नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एच. राजपूत, लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, नांदेड सार्वजनिक बांधकाम विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता ए. बी. चौगुले, लातूरचे कार्यकारी अभियंता एम. एम. पाटील, देवेंद्र निळकंठ यावेळी उपस्थित होते.
रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरण करण्यासाठी लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून तयार केलेले मॉडेल अतिशय उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी जमा न होता, त्याद्वारे भूजल पुनर्भरण होईल. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होवून शेतीला मदत होईल. तसेच रस्त्याचे जीवनमान वाढेल. त्यामुळे राज्यात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये या उपक्रमाचा समावेश केला जाईल. मराठवाडा, विदर्भासह पाणी टंचाईची समस्या जाणवणाऱ्या इतरही जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (पीएमआयएस) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कामाची विविध टप्प्यावरील माहिती, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर व्हिडीओ, छायाचित्रे अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व अधिकाऱ्यांनी या प्रणालीवर अद्ययावत माहिती अपलोड करावी. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत, कामांच्या दर्जाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेवून त्याचा निपटारा करावा. तक्रारींची पडताळणी करून त्याबाबतची वस्तुस्थिती संबंधितांना अवगत करावी, असे चव्हाण यावेळी म्हणाले. अर्थसंकल्पीय कामे, तसेच योजनेतर कामे जास्त काळ प्रलंबित राहू नयेत, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.औरंगाबाद आणि नांदेड सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात सन 2022-23 मध्ये पूर्ण झालेले रस्ते, पूल आणि शासकीय इमारती, तसेच अर्थसंकल्पीय कामांची सद्यस्थिती, प्रगतीपथावर असलेल्या कामांची सद्यस्थिती, तसेच नवीन मंजूर कामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी घेतला. तसेच निवीदेच्या मंजूर किंमतीपेक्षा अधिक खर्च टाळण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
मुख्य अभियंता उकिर्डे यांनी औरंगाबाद प्रादेशिक विभागांतर्गत कामांचे, तसेच मुख्य अभियंता पांढरे यांनी नांदेड प्रादेशिक विभागांतर्गत कामांची माहिती सादर केली. लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी ‘रेन रोड वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन भास्कर कांबळे यांनी केले.