पोलिसांचे लक्ष वसुलीवर !! जनतेची सुरक्षा वाऱ्यावर!!!
पिंपरी येथील तुंबळ हाणामारीत अनेक जखमी; पंधरा लोकांवर गुन्हे दाखल
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध धंदे जोरदार चालू आहेत, आणि पोलिसांचे लक्ष केवळ वसुलीवर लागल्यामुळे नागरिकांचे भवितव्य आणि सुरक्षा वाऱ्यावर सोडली की काय? अशी चर्चा पिंपरी येथील तुंबळ हाणामारीच्या नंतर ग्रामीण भागात सुरू आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी येथे झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत. या दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्यामुळे जवळपास 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी केंद्रे कुसुम ज्ञानोबा यांनी ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संदीप अंगद केंद्रे, बापूराव तुकाराम केंद्रे, दत्तात्रय विठ्ठल केंद्रे, रामदास विठ्ठल केंद्रे, शंकर बापूराव केंद्रे, अनमोल शंकर केंद्रे, तुकाराम रामदास केंद्रे, (सर्व रा. पिंपरी ता. उदगीर) यांनी संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीच्या पतीला, मुलांना, सासर्याला काठीने डोक्यात, पाठीत, पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच आरोपीनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात जखमी असलेल्या ज्ञानोबा दिगंबर केंद्रे व दिगंबर गोविंद केंद्रे यांच्यावर उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. याप्रकरणी आरोपी विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 306/ 23 कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, 34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करत आहेत. तर दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी दत्तात्रय विठ्ठल केंद्रे यांनी तक्रारीत नमूद केले की, आरोपी चंपाबाई दिगंबर केंद्रे, राजकुमार न्यानोबा केंद्रे, ज्ञानोबा दिगंबर केंद्रे, दिगंबर गोविंद केंद्रे, कुसुमबाई ज्ञानोबा केंद्रे( रा. पिंपरी) आणि विजय शिवाजी गुट्टे, शिवाजी रामचंद्र गुट्टे (रा. गुट्टेवाडी) त्यांनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीच्या चुलत भावास काठीने, पाटीवर, हातावर, तोंडावर मारहाण करून दुखापत केली. तसेच सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदार अंबाबाई केंद्रे यांना लाथाबुकच्याने व काठीने हातावर, पाठीवर मारहाण करून दुखापत केली. तसेच भांडण सोडवायला गेलेले साक्षीदार बापूराव केंद्रे यांना कत्तीने व काठीने मुक्का मार दिला. फिर्यादीच्या अंगावर येऊन दगडाने डाव्या डोळ्यावर मारून दुखापत केली, तसेच शिवीगाळ केली. अशी तक्रार दिल्यावरून आरोपी विरुद्ध गु.र. नंबर 307/ 23 कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 भारतीय दंड विधान संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करत आहेत.
सध्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे बोकाळले असून पोलिसांचे लक्ष अवैध धंदे वाढीस लागावेत आणि बऱ्यापैकी आपल्याला कमाई व्हावी, असे असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवैध पद्धतीने गुटखा पुरवठा करण्याचे मोठे काम उदगीर परिसरातून होत असल्याचीही चर्चा जोर धरत असताना देखील, पोलीस मात्र मूग जुळून गप्प आहेत. उदगीर मधील अवैध गुटखा सम्राटावर पुणे पोलिसांनी धाडी टाकून लाखो रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका जप्त केला होता, मात्र याकडे उदगीर पोलिसांनी सोयीस्करपणे डोळेझाक केलेली होती. यामागे कारण काय असू शकते? हे सर्वसामान्य जनतेला चांगले समजते. तरीही जनता गप्प आहे. किमान पोलिसांनी समाजाचे हित जोपासावे, समाजामध्ये चालू असलेल्या अवैध आणि विषारी दारूची विक्री बंद करावी. अशी माफक अपेक्षा असताना देखील पोलीस प्रशासन मात्र चिरीमिरीच्या आशेने अनेकांचे आयुष्य उध्वस्त करत असल्याचा आरोप केला जात आहे.