पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या विविध मागण्यासाठी “व्हॉइस ऑफ मिडिया” मैदानात
उदगीर (एल.पी.उगीले) : समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून प्रश्न सोडवणारे वेळप्रसंगी आपल्या जीवाची ही परवाना करणारे पत्रकार त्यांच्या अनेक समस्या शिल्लक आहेत. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि प्रसिद्धी माध्यम या चार स्तंभांना मिळून लोकशाही असे म्हणतात. अर्थात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. असे असून देखील पत्रकारांच्या प्रश्नांच्या बाबतीत सर्व उदासीन असल्याने पत्रकारांची ‘वाईस ऑफ मिडिया’ या संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेत पहिल्या टप्प्यात लक्षवेधी आंदोलन केले आणि आपल्या विविध मागण्यांचे महसूल प्रशासनामार्फत शासनाला निवेदन दिले आहे. या मागण्यात प्राधान्याने पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, त्याला भरून निधीही उपलब्ध करून द्यावा. पत्रकारितेमध्ये पाच वर्षे पूर्ण केलेल्या सर्व पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, अधीस्वीकृती साठी असलेल्या जाचकाठी रद्द कराव्यात. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी (कर) रद्द करावा. पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून जागा उपलब्ध करून दिली जावी. कोरोना काळात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात विषयक धोरण हे वृत्तपत्रांमध्ये भेदभाव करणारे आहे. जाहिरातीच्या धोरणात क वर्ग दैनिके अर्थात लघु दैनिके यांच्यासाठी हे धोरण मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम वर्ग दैनिका सारख्या जाहिराती देण्यात याव्यात. तसेच साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात, इत्यादी मागण्यासाठी उदगीर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी वाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष गणेश मुंडे, उपाध्यक्ष हनुमंत केंद्रे, कोषाध्यक्ष धनाजी माटेकर, सरचिटणीस माधव अनवले, कार्यवाहक जयराम देमगुंडे, प्रसिद्धी प्रमुख नागेश नवाडे, सदस्य अविनाश सोनकांबळे, विठ्ठल पांडुरंग वळसणे इत्यादी उपस्थित होते.