जुन्या आठवणींना उजाळा; माजी विद्यार्थी पंचगल्ले यांचा अनोखा उपक्रम, जि. प. शाळेस तीस हजारांची पुस्तके भेट

जुन्या आठवणींना उजाळा; माजी विद्यार्थी पंचगल्ले यांचा अनोखा उपक्रम, जि. प. शाळेस तीस हजारांची पुस्तके भेट

वाढवणा (बु.) (एल.पी.उगीले) : शाळा आणि विद्यार्थी यांच्या नात्यांचे बंध हे नेहमीच भक्कम आणि अतूट प्रेमाचे असतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेचे भरीव योगदान असते. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांचेही काही देणे लागते या भावनेतून वाढवणा (बु.) येथील जिल्हा परिषद (मुलांची) प्रशालेचे माजी विद्यार्थी पंडित नागनाथ पंचगल्ले (वय ७५) यांनी आपली शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी जवळपास तीस हजार रुपये रकमेची मौल्यवान ग्रंथ भेट दिली. त्यांनी ही पुस्तके स्वतः शाळेत आणून शिक्षक सुनील बिरादार यांच्याकडे सुपूर्द केली.
भेट स्वरूपात देण्यात आलेल्या या ग्रंथसंपदेत ‘जीवनाचे शिल्पकार व इतर चरित्रे’, ‘स्वप्न आणि सत्य आणि इतर’, ‘दिल्ली डायरी’ (लेखक : साने गुरुजी), ‘द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पिकिंग’ (लेखक : डेल कार्नेजी), ‘द पावर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग’, ‘द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ यांसारखी ज्ञानाची क्षितिजं विस्तृत करणारी ख्यातनाम लेखकांची प्रेरणादायी पुस्तके, कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह ललित लेखसंग्रह अशी वैविध्यपूर्ण व उपयुक्त पुस्तके पंचगल्ले यांनी भेट देऊन आपल्या शाळेसाठी एक आदर्श उपक्रम राबवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समिती सदस्य सूर्यकांत हाळीघोंगडे यांनी केले. यावेळी बोलताना हाळीघोंगडे म्हणाले की, इंटरनेट व मोबाईलच्या जमान्यात वाचकवर्ग तुरळक होत चालला असून सध्याच्या परिस्थितीत ग्रंथ हेच ज्ञानाचे मोठे भांडार आहे. पुस्तकेच माणसाला अंतर्दृष्टी प्रदान करतात. पुस्तकांचे जीवनातील महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त करताना मनोज मठपती म्हणाले की, पैसे संपतात पण पुस्तकातून मिळणारे ज्ञान हीच खरी संपत्ती असून ती कधीही संपत नाही. पुस्तके अमूल्य संसाधन असल्याचे मठपती यांनी सांगितले. पुस्तकरुपाने शाळेस अमूल्य भेट दिल्याबद्दल पंडित पंचगल्ले व परिवारातील सदस्यांचा शाळा प्रशासन व ग्रामस्थांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.दरम्यान पंचगल्ले यांना त्यांच्या १९६५-६७ या शालेय जीवनाच्या प्रवासातील काही जुन्या मित्रांचे पुनर्मिलन झाले. या भेटीत सर्वांनी शाळेचे पहिले मुख्याध्यापक सय्यद मोहम्मद यांच्यासह अनंतराव कुलकर्णी, मुकुंदराव तांदुळवाडीकर, व्यंकटराव भद्रे, अमृतराव केंद्रे, गोपीनाथराव मिरजकर, श्री. संगेवार आदी शिक्षक वृंदांविषयी कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.पंडित पंचगल्ले यांनी दिलेल्या पुस्तकांमुळे शाळेचे ग्रंथालय समृद्ध होऊन विद्यार्थ्यांच्या करिअर बांधणीसाठी मदत होणार असल्याची भावना सुनील बिरादार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी अमीरहमजा शेख, राजाराम पांचाळ, दिग्रस (बु.) येथील मनोहर कुलकर्णी वाचनालयाचे ग्रंथपाल गोविंद शिंदे, देविदास शिंदे, प्रा. शरद पंचगल्ले, प्रशांत हाळ्ळे, गणेश स्वामी, रवी कणजे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शिवाप्पा पाटील यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!