मायेचा सागर...

आई म्हणजे दाता,आई म्हणजे जवळीकतेचा सहवास,आई म्हणजे त्याग आणि निस्वार्थ प्रेमाची परिभाषा,जेकी तुम्ही तिच्या सेवेची कधीच परतफेड करु शकणार नाहीत ; पण एवढे नक्कीच करु शकतोत, जिच्यामुळे या आयुष्याचा अनुभव घेत आहोत तिच्या विषयी कृतज्ञ राहून, जमेल त्या रुपात आभार व्यक्त करुन तिला आत्मिक समाधान देऊ शकतोत…! खरंतर तिच्याविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी खास आशा एका ठरावीक दिवसाची गरज नसते ; पण मातृदिनाच्या दिवशी हे प्रेम व्यक्त केले जाते… म्हणून सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
       आई हा शब्द उच्चारताच मनाचा गाभारा हळव्या भावनांनी  भरुन जातो. आई ह्या शब्दात सारे ब्रम्हांड सामावलेले आहे, जेणेकरून हा शब्द उच्चारताच एक वेगळ्या प्रकारचे आत्मिक सुख मिळते..
        आई मग ती कोणाचीही असो, ती आपल्या बाळाला कुशीत ठेऊन या सुंदर पृथ्वीतलावर आपल्याला जन्माला घालते… जिच्यामुळे तुम्ही जीवन जगता, तिचे उपकार फेडण्याइतके आपण महान नाहीत, कारण ती आई म्हणजे एक वात्सल्याचा महान सागर असते…
     प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई,
ममत्व भरले तिच्या ओतप्रोत ठायी…
      आशी ही जिव्हाळ्याची,त्यागाची महान मुर्ती आयुष्भर केलेल्या सेवेचा मोबदला न मागणारी व्यक्ती म्हणजे आई..! तशीच माझीही आई होती,ती आज सोबत नसली तरीही तिने दिलेले संस्कार, प्रेरणा, कायमस्वरूपी सोबत राहतील..
      सतत आपल्या लेकरांसाठी घरात आणि शेतात राबून घामाघूम झालेली आई आठवली की,जीव व्याकूळ होतो…
      धन्य तुझी ती कुस,
      धन्य तुझी ती ममता,
      ऊन, वारा, पाऊस झेलूनी,
      खाल्ल्या तु किती खस्ता..!
      “आठवतं मला वडिलांचं छत्र गेलं आणि तुझ्यावर आभाळ कोसळलं..! तरीपण त्या दु:खाचा डोंगर सारुन आयुष्याला स्वतःची वाट मोकळी करून देणारी तु धैर्यशील आई ठरलीस.. आम्हाला कसं जगता येईल आणि चार शब्द शिकवून शहाणं करता येईल हेच तुझं अंतिम ध्येय होतं आणि ते तु साध्य केलस, हे एक हिमंतवाण आईचं करु शकते..”
       ” आठवतं मला ज्यावेळी तु शेतात आणवानी पायांनी राबायचीस, जेव्हा तुझ्या पायात रुतलेले काटे आणि लागलेल्या दसकटांनी पाय फाटायचा त्यावेळी त्या काळ्या आईने तुझं सांडणारं रक्त कित्येकवेळा स्वतःमध्ये सामावून घेतल़..! डोक्याइतक्या गवतात जाऊन गवत कापणारी आई आठवली की, पोटात भीतीचा गोळा येतो.. कित्येक वेळा काम करताना तुझी बोटं कापली, तेव्हा चिंभळीला नेलेल्या धुडक्याचं चिरगूट काढून तु स्वतःच एका हाताने बोटाला वांधलीस आणि त्या जखमेचा विचार न करता लागलीस कामाला..! डोक्यावर तीस किलोची पोती वाहुन नेणारी आई आठवली की, वाटतं ती एक दुर्गेचा अवतारच..!”
       जगताना प्रसंगी तुला झालेला इतरांचा अन्याय, विरोध पत्करून सहा मुलींना मोठं
करणं, त्यांना उच्च शिक्षण देणं ही एक महान माताच करु शकते. तुझ्यासाठी किती बोलावे तेवढं कमीच आहे.. म्हणून कायम आम्ही तुझ्या ऋणात राहू..!
       प्रत्येकाची आई देवता स्वरुप आसते. आई ही क्षणाची पत्नी तर अनंतकाळची माता आसते, म्हणून तिचा आत्मसन्मान व तिच्यातील ममत्वाचा आदर करायचा असेल  तर, प्रत्येकाने घरातील माऊलींचे सतत स्मरण ठेवले पाहिजे. तिला सुखी आणि समाधानी ठेवाल तर आपोआपच तुम्ही सुखी रहाल?
       मुल जन्माला घालताना ती मुलगा-मुलगी हा भेदभाव न करता ती जन्माला घालते आणि तिच्या माया-ममतेचा पान्हा दोघांसाठी सारखाच फुटतो, हे मात्र सांगायला नको..! म्हणून ‘आई तु माझी गती आहेस’
आसं म्हणणं उचित ठरेल..!
     फेडता न येणारे,
     असे तुझे हे उपकार,
     लहानच राहु इच्छिते,
     ऋणात सदासर्वकाळ..!
                
                    – प्रतिभा शेळके – ढेले          

About The Author