छत्रपती संभाजी राजांचा इतिहास समाजाला प्रेरणादायक – डॉ. मारोती कसाब
अहमदपूर ( गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन करुन सुराज्यात रुपांतर करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास हा समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कवी, लेखक आणि साहित्य- संस्कृतीचे अभ्यासक डॉ. मारोती कसाब यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक अशोकराव कासले, किरणकुमार परतवाघ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. कसाब म्हणाले की, पारंपरिक कथा कादंबऱ्या आणि चित्रपट नाटकांतून छत्रपती संभाजी राजांचा इतिहास विकृत करण्यात आलेला आहे. मात्र आधुनिक काळातील काही नव्या दमाच्या इतिहासकारांनी संशोधन करून छत्रपती संभाजी राजांची खरी खरी प्रतिमा उभी केलेली आहे. संभाजी राजांना सोळा भाषा अवगत होत्या. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्यानंतर नऊ वर्ष शत्रूशी खंबीरपणाने लढत त्यांनी स्वराज्याचे संरक्षण केले. शेवटी स्वराज्यासाठीच त्यांनी बलिदान दिले, असेही ते यावेळी म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. सतीश ससाणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.