अंधत्व निवारणात उदयगिरी लाॅयन्सचे योगदान लाख मोलाचे – प्रवीण मेंगशेट्टी
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण जगात उदगीर शहरातील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय ओळखले जाते.अंधाना दृष्टी देणारे रुग्णालय म्हणजेच उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय अशी ओळख निर्माण होत आहे.अंधत्व निवारणात तर खूप मोलाचे कार्य हे नेत्रमंदीर करत आहे.असे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी सांगितले. ते उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर येथे आयोजित निरोप समारंभ सत्कार कार्यक्रमात मेंगशेट्टी बोलत होते.
यावेळी उदयगिरी लायन्स नेत्ररुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, तहसीलदार रामेश्वर गोरे,प्रदीप बेद्रे,प्रा. महेश बसपुरे,सुरेश देबडवार, नेत्रतज्ञ अपूर्वा मॅडम,नेत्रतज्ञ प्रमोद जमादार, डाॅ.गुजराती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रूग्नालयाच्या वतिने शाल, श्रीफल, दृष्टी अंक व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना प्रवीण मेंगशेट्टी यांनी सांगितले की, उदगीर तालुक्यातील अनेक गावात मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले आहेत. अशा लोककल्याणकारी शिबिराच्या कार्यक्रमास अनेक वेळा उपस्थित राहण्याचा योग आला होता. अंधत्व निवारणाच्या या महायज्ञात या रुग्णालयाचे कर्मचारी शिबीराच्या माध्यमातून गोरगरीब नागरीकांचा घरोघरी जाऊन नेत्र तपासनी करून घेण्यासाठी प्रबोधन करतात. गावात एकही पेशंट नेत्र तपासणी पासून दूर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करतात. एखाद्या गोरगरीब व्यक्तीस मोतीबिंदू झालेला आहे, आणि केवळ त्यांच्या कडे पैसे नाहीत या कारणाने रुग्ण नेत्रशस्त्रक्रिया पासून दूर राहू नये यासाठी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी हे सामाजिक कार्य एक जीवाभावाच्या नात्याप्रमाणे करत आहेत.आणि या कार्याचा गौरव जागतिक पातळीवर होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या गतिमान कामामुळे लवकरच उदगीर तालुका अंधत्व मुक्त म्हणून ओळखला जाईल, असेही उद्दगार काढले. यावेळी रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, डॉक्टर्स व रुग्णालयातील पेशंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.