डॉ. संतोष मुंडे यांच्या माध्यमातून नाथराव फड यांच्यावर लाखो रुपयांची खर्चिक शस्त्रक्रिया झाली मोफत
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : मांडवा येथील नाथराव फड हे गेल्या अनेक वर्षांपासून किडनी स्टोनने त्रस्त होते. त्याचे कारण म्हणजे नॉर्मल किडनी स्टोनसारखा हा प्रकार नव्हता, जवळपास पंचवीस ते तीस स्टोन असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अनिवार्य होते. मात्र त्याचा खर्च दोन ते अडीच लाख रुपये होता. नाथराव फड यांनी डॉ. संतोष मुंडेंना संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली.
त्यानंतर डॉ. संतोष मुंडे यांनी तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन बांगर यांच्याशी संपर्क साधून पूर्ण परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. डॉ. संतोष मुंडे यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. सचिन बांगर यांनी ही खर्चिक शस्त्रक्रिया मोफत करण्याचा शब्द दिला व त्यानुसार नाथराव फड यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
या शस्त्रक्रियेत नाथराव फड यांच्या किडनीमधून वेगवेगळ्या आकाराचे तब्बल पंचवीस ते तीस स्टोन यशस्वीरित्या काढले. दरम्यान नाथराव फड यांची किडनी मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झालेली आहे, त्यामुळे पुढेही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत डॉ. संतोष मुंडे यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे रुग्ण नाथराव फड तथा त्यांचे नातेवाईक मंडळींनी डॉ. संतोष मुंडेंचे आभार मानले आहेत.