बाजार समितीचे नूतन संचालक प्रा. डॉ. डावळे यांचा सत्कार
वाढवणा (बु.) (प्रतिनिधी) : अत्यंत अटीतटीची व प्रतिष्ठेची ठरलेली उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत उमेदवार प्रा. डॉ. शामराव डावळे हे सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटातून विजयी झाले. संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वाढवणा (बु.) येथील उत्कर्ष बचत गट व डावळे प्रेमी मित्र मंडळाच्यावतीने हृद्य, भावस्पर्शी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सूर्यानंद जाधव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाप्पा पाटील यांनी केले. प्रा. डॉ. शामराव डावळे यांना कसलीही घराणेशाहीची पार्श्वभूमी नसताना, बाजार समितीची ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नसताना देखील प्रा. डावळे यांनी झुंज दिली व विजय संपादन केला. त्यांचा लोकसंग्रह मोठा असून ते नेहमी इतरांसाठी स्वतःचा वेळ, पैसा देऊन सर्वच स्तरांतील लोकांची निरपेक्ष भावनेने कामे मार्गी लावून देण्यात धन्यता मानतात.
‘लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनल’चे विजयी उमेदवार तथा सत्कारमूर्ती डावळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, ‘केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून मतांच्या बेरजेसाठी राजकारण करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही निवडणूक आम्ही लढवली नाही, तर शेतकऱ्यांना नवसंजीवनी देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आधारभूत किमतीसह आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविणार आहोत’. निवडणूकीतील या यशाचे श्रेय उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना देऊन श्री. डावळे पुढे म्हणाले, मागील काळात आपण निष्ठेने, प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ही पावती आहे. वाढवणा (बु.) येथे वेअर हाऊस व बहुउद्देशीय सभागृह उभा करण्याच्या प्रस्तावास शासनस्तरावर मंजुरी घेणार असल्याचेही आश्वासन श्री. डावळे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी उत्कर्ष बचत गटाचे अध्यक्ष मनोज मठपती, सचिव प्रशांत हाळ्ळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सूर्यानंद जाधव व अन्य सदस्यांच्या हस्ते प्रा. डावळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल हाळ्ळे, रवी घोणसीकर, उमेश गवळी, गोरक्ष क्षीरसागर, नागेश हरनाळे, प्रसिद्ध उद्योगपती अक्षय हरनाळे, रितेश राजमाने, माजी सैनिक मोहन कानपूर्णे, बांधकाम व्यवसायिक केदार बुक्के, दत्ता उपासे, रवी कणजे, गणेश स्वामी, ओमप्रकाश थोन्टे, दत्ता कदम व डावळे प्रेमी मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज मठपती यांनी केले. प्रशांत हाळ्ळे यांनी सर्वांचे आभार मानले. वाढवणा (बु.) येथील उत्कर्ष बचत गटाच्या कार्यालयात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.