कोरोना प्रादुर्भावामुळे रस्ते झाले सुनेसुने

कोरोना प्रादुर्भावामुळे रस्ते झाले सुनेसुने

पारावरच्या गप्पांना ब्रेक; गावाचा संवादही झाला फिका

औसा (प्रशांत नेटके) : सकाळी रस्त्यावर गप्पा मारत उभे असलेली ग्रामीण भागातील माणसं कोरोनाच्या कडक निर्बंधाच्या काळात दिसेनाशी झाली आहेत. यामुळे आपापसातला संवादच जणू हरपल्याची स्थिती झाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

एरव्ही सकाळी सात वाजताच गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घोळक्याने उभे असलेले गावकरी आता दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पातेल्यातील गरमागरम चहाच्या वाफा आणि नाश्त्याची लगबग दिसत नाही.
कढईत उकळणाऱ्या तेलातील भज्यांचा ,गरम वडापावचा आस्वाद नाही, अन गावात घडलेल्या घटनांची चर्चा नाही. गावच्या राजकारणाचा व घडामोडींचा आखाडा समजल्या जाणाऱ्या या चहा व पानटपऱ्या सध्या ओस पडल्या आहेत.

चल उठ ….या गोष्टीवर चहा पाजतो ……..पानसुपारी खाऊ …….असे हातावर टाळी देऊन दणक्यात आवाज देणारा वर्ग सध्या रस्त्यावरून गायब झाला आहे.
त्यामुळे चहा पाजनारे व पिणारे कोणीच दिसत नाहीत. सकाळच्या गप्पा व चहा टपरीवरच जाऊन घ्यायचा असा दिनक्रम असलेल्या मंडळींची संख्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे सकाळपासूनच ग्रामीण भागात रस्ते गर्दीने फुलून जातात. कोरोनामुळे गावाकडचे रस्ते जणू मुके झाल्याचा अनुभव सध्या येत आहे.

नेहमी गर्दीतून वाट काढत असताना हॉर्न वाजवत जाणाऱ्या दुचाकी गाड्या व चारचाकी वाहने आता निर्मनुष्य दिसत आहेत. गावच्या पारावर व मंदिराच्या परिसरात,चावडीवर रंगणारी गप्पांची मैफिल आता लुप्त झाली आहे.

घरात होतेय घुसमट : घरात बसून अनेकांची घुसमट होत आहे. परस्परांतील संवाद दुरावला जात आहे. केंव्हा हा कोरोना संपतो व व सगळं कधी सुरळीत होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

error: Content is protected !!