बाजार समितीच्या उपसभापती पदावर निवड व्हावी म्हणून अनेकांची मोर्चे बांधणी

बाजार समितीच्या उपसभापती पदावर निवड व्हावी म्हणून अनेकांची मोर्चे बांधणी

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या वेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर, भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले शिवाजीराव हुडे यांच्याकडे नेतृत्व सोपवल्यामुळे बाजार समितीच्या सभापती पदावर शिवाजीराव हुडे यांची वर्णी लागणार, हे निश्चित आहे. मात्र उपसभापती पदावर युवक आणि महिलांना संधी म्हणून महिला गटातून सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या, लोकनेते चंद्रशेखर भोसले यांची सुकन्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांची निवड व्हावी, म्हणून लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांचे कार्यकर्ते सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांना साकडे घालून मागणी करत असल्याची चर्चा आहे.तसेच काँग्रेस कडे सभापती तर राष्ट्रवादीकडे उपसभापती पद द्या. अशी मागणी करत काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे यांचे निकटवर्ती ज्ञानेश्वर पाटील यांना उपसभापती पद द्यावे. असा अट्टाहास उदगीरचे आमदार माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांच्याकडे धरत आहेत.

महाविकास आघाडीच्या धोरणानुसार समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळावा, या उद्देशाने मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मधुकरराव एकुरकेकर यांना संधी दिली जावी, अशी ही मागणी जोर धरत आहे. कार्यकर्त्यांचा रेटा विचारात घेऊन पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाच्या बाजूने निर्णय देईल? हे स्पष्ट नसले तरीही आपापल्या परीने मोर्चे बांधणी केली जात आहे. तसेच आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वास असल्याने प्रत्येक कार्यकर्ता आपलीच सरशी होईल, म्हणून शर्यती लावल्या जात आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्यालाच संधी मिळावी म्हणून धडपड करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.

About The Author