प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार प्रदान
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते सन्मानित
अहमदपूर ( गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना हिंदवी बाणा लाईव्ह आणि कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान, कंधार यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय लोकमान्य टिळक पुरस्कार कंधार येथे भव्य कार्यक्रमात नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक लोकमत सारख्या बलाढ्य आणि नामांकित लोकप्रिय दैनिकातून केली. लोहा कंधार तालुक्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी या भागातील सामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारला भाग पाडले. तसेच आपल्या निर्भीड पत्रकारितेतून शासन प्रशासनाला वारंवार धारेवर धरत विकासाचे प्रश्न धसास लावले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पत्रकारिता करत करतच लोहा कंधार भागातील लोक जीवनाचे सांस्कृतिक संचित त्यांनी सर्वदूर महाराष्ट्रात गाजविले.
मराठवाड्यातील लोकभाषा आणि लोकसंस्कृतीला पत्रकारितेतून जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले आहे. या कार्याची दखल घेऊन कंधार येथील हिंदवी बाणा लाईव्ह आणि कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान यांच्यावतीने त्यांना नुकताच समारंभपूर्वक राज्यस्तरीय लोकमान्य टिळक पुरस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील निर्भिड वक्ते तथा दैनिक ‘सामना’ चे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बबनराव थोरात, मा. खा. सुभाष वानखेडे, मा आ. रोहिदास चव्हाण, मा. आ. ईश्वरराव भोसीकर, ॲड. मुक्तेश्वरराव धोंडगे तसेच शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे, दैनिक लोकपत्रचे संपादक रवींद्र तहकीक, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, मन्याड फाउंडेशनचे संचालक एकनाथ दादा पवार, सिनेअभिनेते अनिल मोरे, बालाजी पांडागळे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील पुरस्काराबाबत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.