गरिबांना लुटायची सुटली खाज !! एसीबीच्या पथकाने जिरवलाच माज!!!
लातूर (एल. पी. उगिले) : शासनाच्या वतीने समाजातील उपेक्षित, विमुक्त जाती व भटक्या जमाती, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अशा लोकांना स्वावलंबी बनवावे. आर्थिक स्थैर्य निर्माण करावे, उद्योगधंदे उभा करावेत. अशा उदात्त हेतूने शासनाच्या वतीने विविध विकास महामंडळाची निर्मिती करून प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असतो. मात्र या यंत्रणेतील झारीतल्या शुक्राचार्याकडून खऱ्या लाभार्थ्यांना लुबाडण्याचेच काम गतीने होत आहे. त्यात भरीत भर म्हणजे दलाल आणि लाचखोर यांचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. आपण किती गरीब लोकांना लुटतोय? याचे देखील भान विसरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना भानावर आणण्यासाठी लातूर विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे.
याचे उदाहरण म्हणजे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय, लातूर. येथे या योजनेचा लाभ मिळावा म्हणून एका व्यक्तीने एक लाख रुपयांच्या कर्जासाठी फाईल केली होती. या महामंडळा अंतर्गत एक लाख रुपये थेट कर्ज योजनेच्या प्रलंबित असलेल्या त्याच्या फाईल साठी, ती फाईल मंजूर करणे आणि हेड ऑफिसला पाठवण्यासाठी या कार्यालयातील लिपिक तातेराव काशिनाथ जाधव (वय 38 वर्ष) याने तक्रारदार यास पाच हजार रुपयांची लाच मागितली. ती लाच टप्प्याटप्प्याने द्यायची, पहिला हप्ता म्हणून पाचशे रुपये लगेच द्यायचे. अशा पद्धतीची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 19 मे आणि 22 मे रोजी या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. आणि पडताळणी पूर्ण होताच, लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाचशे रुपये देण्यासाठी तक्रारदार हा आरोपी तातेराव जाधव यांना भेटण्यासाठी गेला. समाज कल्याण कार्यालयाच्या बाहेर जाऊन भेट घेतली, आणि मागणी केल्याप्रमाणे पाचशे रुपये लाच पंचा समक्ष दिले, आरोपीने लाच स्वीकारली. तेव्हा लाचेच्या रकमेसह लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना अटक करून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे नेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
समाजाचे कल्याण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळातील कर्मचाऱ्यांनी, समाजातील गोरगरीब लाभार्थ्यांना लुटण्याचा प्रकार सुरू केल्याने समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. अशा लाचखोर प्रवृत्तीला वेळीच आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे. सदरील सापळा डॉ. राजकुमार शिंदे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या सूचनेवरून, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनवर मुजावर आणि त्यांच्या टीमने यशस्वी सापळा रचला. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी ईसम, दलाल कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासनाने ठरवून दिलेली कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर कार्यालयाशी संपर्क करावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलीस उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांनी आवाहन केले आहे.