राजमाता अहिल्यादेवी महान सेनानी व महान तत्वज्ञानी होत्या – डॉ. बब्रुवान मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : जगात फार कमी स्त्रियांना आपल्या कर्तृत्वाने राजमुकुट धारण करून राज्य करता आले. त्यापैकी राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर या भारतातीलच नव्हे ; तर जगातील महान सेनानी व तत्त्वज्ञानी राज्यकर्त्या होत्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात फार मोजक्या स्त्रियांनी कर्तृत्व गाजवले. त्यापैकी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची कारकीर्द जगाला आदर्श ठरली. कारण त्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर आदर्श तत्त्वज्ञानीही होत्या. त्यांचा हा आदर्श आजच्या राजकीय नेत्यांनी घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवींची राजधानी म्हणजे कलेचे माहेरघर होते. पंडित कवी मोरोपंत, संस्कृतचे अभ्यासक खुशालीराम , शाहीर अनंतफंदी आदी कवी आणि कलावंतांना तसेच अनेक मूर्तीकार कारागिरांना राजाश्रय मिळाला होता. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक प्राचीन वास्तूंचा जिर्णोद्धार केला. आपल्या कर्तृत्वाने आणि कुशाग्र बुद्धीमत्तेने त्यांनी आदर्श राज्य निर्माण केले, अशा शब्दांत त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर यांनी केले.