आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली उपोषणार्थी व्यापाऱ्यांची भेट

आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली उपोषणार्थी व्यापाऱ्यांची भेट

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील तहसील
कार्यालयासमोर जुनी नगरपरिषदेच्या जागेत लघु व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध सोमवार, २२ मेपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आमदार बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन उपोषणार्थ्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. मागण्या सोडवून घेण्यासाठी सोबत असल्याचे सांगून कायद्यानेच काम करावे लागणार असल्याचे सांगितले.

शहरातील जुनी नगरपरिषदेच्या जागेतील व्यापाऱ्यांची दुकाने अतिक्रमण समजून हटविण्यात येणार आहेत. त्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. या नवीन गाळ्यात अगोदरच्याच व्यापाऱ्यांना प्राधान्याने दुकाने द्यावीत, यासंदर्भात तहसील कार्यालयासमोर व्यापाऱ्यांच्यावतीने उपोषण करण्यात येत आहे. आज ( गुरुवारी) उपोषणाचा चौथा दिवस आहे. नगरपरिषदेच्यावतीने सदर जागेवरील अतिक्रमित व्यापाऱ्यांची काही अतिक्रमणे हटवली आहेत.

काहींची हटविण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी नगगरपरिषदेच्यावतीने नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. त्या संकुलात नवीन दुकाने मूळ भाडेधारकंनाच प्राधान्याने द्यावीत, या मागणीसाठी येथील व्यापारी २२ मेपासून उपोषणास बसले आहेत. सदर उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करुन, रास्ता रोको, सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बुधवार, २४ मे रोजी पुन्हा एकदा प्रशासनाला दिला आहे.

या अनुषंगाने आमदार बाबासाहेब पाटील यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मी तुमच्या पाठीशी आहे. परंतु, कायद्याने आपणास दिलेल्या आदेशानुसारच काम करावे लागणार आहे. नवीन गाळे शासनाच्या नियम व अटीनुसारच वितरित करण्यात येतील, असे सांगितले. यावेळी शिवानंद हेंगणे, सांब महाजन, शंकर गुट्टे यांची उपस्थिती होती.

About The Author