अंगणवाडी मध्येच विद्यार्थ्यांची शिक्षणातून खरी प्रगती होते – आमदार बाबासाहेब पाटील

अंगणवाडी मध्येच विद्यार्थ्यांची शिक्षणातून खरी प्रगती होते - आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) अंगणवाडीच्या महिला शिक्षिका या विद्यार्थ्यांना बालवया मध्येच गोड बोलून ,प्रेमाने त्यांना ज्ञानदानाचे खूप चांगले कार्य करतात. लहान असताना त्यांना शिस्त लावण्याचे , ज्ञानदान करण्याचे काम , मुलांना बडबड गीते, गाणी, गोष्टी ,व मनोरंजनातून शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची प्रगती आणि प्रबोधनाचे योग्य व चांगले काम करीत असल्याची प्रशंसा आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली.
येथील तहसील कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिरात उद्घाटन प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी हे होते. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. शोभा घोडके , गट शिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार ,डॉक्टर बाळासाहेब बयास ,ना. तहसीलदार बबीता आळंदे , शिवानंद हेंगणे ,सांब महाजन , शिवाजीराव देशमुख, प्रशांत भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की अंगणवाडी महिला शिक्षिका या खूप ज्ञानी, हुशार आहेत. बालवाडी ताईंचा पगार वाढला पाहिजे यासाठी मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.आपण बालकांना ज्ञानदानाचे कार्य करता, मुले रडत असतील तर त्यांना आपण प्रेमाने, गोड बोलून चांगले सांभाळता.लेकरांना शांत करण्याची परमेश्वराने ही फार मोठी शक्ती महिलांना दिल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. ते म्हणाले शिक्षण क्षेत्रात निधी कमी पडता कामा नये, सर्व विषयांसाठी शिक्षक राहणे गरजेचे असून महिलांचे अनेक प्रश्न असूनही महिला वेळेवर उपस्थित राहतात, व्यवस्थित काम करतात, आपल्या पदाला आपण योग्य न्याय देणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगितले. आ.पाटील पुढे म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. आपण शिक्षण घेऊन खूप पुढे जात आहात.अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात लोकांना पर्यटनाचे वेळी त्रास होऊ नये म्हणून पानवठे, धर्मशाळा काढल्याचे सांगून आपणही भविष्यात चांगले काम करावे, वाईट रोखले पाहिजे अन्यथा राज्याचे वाईट होणार असल्याचे शेवटी सांगितले.
महिला बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालुक्यातील ज्यांच्या अडचणी आहेत अशा अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या. काहींनी आपले प्रश्न उपस्थितांसमोर मांडले. याबरोबरच तेथे १७ शासकीय विभागाची महिलांना माहिती व्हावी या उद्देशाने तेथे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी बचत गटाच्या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. महिलांनी आपल्या समस्यांच्या बाबतीत फार्म भरून दिले असून त्या कामाच्या संदर्भात आढावा व पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याकडून सांगण्यात आले.

About The Author