उदगीर येथे शुक्रवारी, जळकोट येथे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन
लातूर (एल.पी.उगीले): शासनाच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. या अंतर्गत उदगीर येथे शुक्रवारी (दि. 26) आणि जळकोट येथे शनिवारी (दि. 27) रोजी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ तत्काळ मंजूर करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्य शासनामार्फत राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर राबविले जात आहे. लातूर जिल्ह्यात 22 मे रोजी औसा येथून या उपक्रमास सुरुवात झाली असून प्रत्येक तालुकास्तरावर हे अभियान राबविले जाणार आहे.
उदगीर येथील देगलूर रोडवरील राधेकृष्ण मंगल कार्यालयात 26 मे रोजी सकाळी 8 वाजता ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
याठिकाणी महसूल, आरोग्य, नगरपरिषद, पंचायत समिती, कृषि, मनरेगा, एकात्मिक बाल विकास, शिक्षण विभाग, जलसंधारण, वन विभाग, महावितरण, पशुसंवर्धन, भूमीअभिलेख, दुय्यम निबंधक, पोलीस विभागाची दालने उभारण्यात येणार आहेत.
जळकोट येथे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम जळकोट तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी 27 मे रोजी सकाळी 8 वाजता ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जळकोट शहरातील कुणकी रोडवरील तिरूमल्ला मंगल कार्यालयात आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे यावेळी वितरण केले जाणार आहे. तसेच विविध शासकीय विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समस्या समाधान शिबीर घेण्यात येणार असून तालुक्यातील महिलांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार सुरेखा स्वामी, तालुका कृषि अधिकारी आकाश पवार, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी केले आहे.