आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या 9 व्यक्ती विरोधात तीन गुन्हे दाखल
लातूर(एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील जुगार, सट्टा अशा अवैध प्रकाराच्या विरोधामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार लातूर पोलिसांनी कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून रोख रक्कम आणि या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) मोबाईलवरुन घेणाऱ्यावर अहमदपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक 24/05/2023 संध्याकाळी छापा मारून 5 लाख 68 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह 6 व्यक्तींना जेरबंद करण्यात आले आहे, तर 3 व्यक्ती फरार झाल्या आहेत. अहमदपूर व चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांची माहिती घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चाकूर व अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे अहमदपूर उपविभागातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, अहमदपूर शहरामध्ये काही व्यक्ती त्याच्या मोबाईल फोनवर ऑनलाईन साईटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावून सट्टा खेळत आणि खेळवित आहेत.
या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी त्यांच्या पथकातील तसेच अहमदपूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमलदारांचे वेगवेगळी तीन पथके नेमून मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यावरून पथकातल्या पोलिसांनी अहमदपूर शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी एकाच वेळी छापा मारला, तेव्हा काही इसम मोबाईल फोनवर काही तरी खेळताना आणि वहीमध्ये आकडेमोड करताना मिळून आले. पोलीस पथकाची खात्री होताच त्यास जागीच पकडून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव राधाकिशन उर्फ बाळू बालाजी वरंगलवाड, (वय 32 वर्ष, राहणार शिरूरताजबंद, तालुका अहमदपूर),
अंतेश्वर पांडुरंग भताने, (वय 20 वर्ष, राहणार भतानेवाडी, तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड),नवनाथ वैजनाथ फड, (राहणार धर्मापुरी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.(फरार)), सुंदरलाल कलु राऊतरे, (वय 35 वर्ष, राहणार गवळी गल्ली, अहमदपूर),
शुभम कळू राऊतरे, (वय 24 वर्ष, राहणार गवळी गल्ली, अहमदपूर),लखन यादव, (राहणार गंगाखेड जिल्हा परभणी.(फरार)),
धरम भीम लाल काबलिया, (वय 25 वर्ष, राहणार गवळी गल्ली, अहमदपूर),नीलकांत गोपाल काबलिया, (वय 34 वर्ष, राहणार महात्मा फुले विद्यालय रोडच्या बाजूला, अहमदपूर), बाळू राजे, (राहणार चौढा नगर अहमदपूर. (फरार))असे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.सदर इसमाच्या मोबाईलची पहाणी केली असता त्याचे मोबाईल फोनमध्ये आयपीएल किकेट मॅचवर सट्टा लावून खेळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल फोनसह त्यांना ताब्यात घेतले.ताब्यातील इसमाची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत क्रिकेट सट्याचे साहित्य, विविध कंपन्याचे अनेक मोबाईल,रोख रक्कम असा एकूण 5 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, नमूद आरोपी विरुध्द अहमदपूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 309/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ),
अहमदपूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 310/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 व अहमदपूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 311/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 प्रमाणे असे तीन गुन्हे दाखल करून नमूद 6 आरोपी ताब्यात असून 3 आरोपी फरार आहेत.पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाही अहमदपूर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अहमदपूर व चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच अहमदपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बंकवाड व पोलीस अंमलदारांनी केली आहे.