महाराणी अहिल्यादेवींच्या कार्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागेल – डॉ. बब्रुवान मोरे

महाराणी अहिल्यादेवींच्या कार्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागेल - डॉ. बब्रुवान मोरे

अहमदपूर ( गोविंद काळे) : राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात जन्म घेऊन मध्य प्रदेश आणि संपूर्ण भारतभर आपल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची नोंद घ्यावी तेवढ्या प्रमाणात इतिहासात आढळत नाही. एक स्त्री म्हणून त्यांच्यावर इतिहासकारांनी हा अन्याय केला असला तरी आगामी काळातील इतिहासाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक, संशोधक डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. याबाबत अधिक माहिती अशी की महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष प्रबोधन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की महाराणी अहिल्यादेवींच्या फक्त धार्मिक कार्याची दखल घेतली जाते, मात्र त्याबरोबरच प्रशासनात त्यांनी अनेक उत्तम निर्णय घेतले आणि स्त्रियांना तसेच बहुजनांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. महाराणी अहिल्यादेवींची युद्धनीती जागतिक पातळीवर नावाजली गेली आहे, असेही यावेळी ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की महाराणी अहिल्यादेवींच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्याचा आदर्श सध्याच्या राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने भारताला महासत्ता होता येईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश ससाणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author