कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी कायम लक्षात राहतात – डॅनियल जॉन बेन
उदगीर (एल.पी.उगीले) : पूर्णवेळ जनतेसाठी काम करणारे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील ते जनतेच्या कायम स्मरणात राहतात. उदगीरच्या जनतेमध्ये कृतज्ञता आणि प्रेमाची जाण ठेवण्याची तयारी असल्यामुळे ज्यांनी आपल्यावर प्रेम केले, त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि कृतज्ञता दाखवतात. असे विचार उदगीरचे मावळते उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांनी व्यक्त केले. उदगीर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव एडके यांच्या सेवानिवृत्तीच्या आणि उदगीर शहरांमध्ये सिंघम म्हणून ओळखले जाणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय दळवे पाटील यांच्या बदलीच्या निमित्ताने आयोजित निरोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी देवणीचे पोलीस निरीक्षक सांडोरे, उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमाशंकर गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एडके असतील किंवा संजय दळवे असतील यांनी आपल्या कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. ही गोष्ट उदगीरकरांच्या मनावर बिंबवली गेली आहे. त्यामुळेच पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग मिळाला आहे. जनतेचा हा प्रतिसाद ही गोष्ट जनता आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद दाखवते, असेही सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी केले, तर प्रास्ताविक उदगीर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले. आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी केले.
