म्युकॉर्मायकॉसिस आजारासंबंधी राष्ट्रीय वेबिनार(चर्चासत्र)चे आयोजन
उदगीर ( प्रतिनिधी ) : धन्वंतरी मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर आणि लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,उदगीर, यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दिनांक:-12 जून 2021 रोजी दुपारी 02.30 ते सायंकाळी 05.00 या वेळेत म्युकॉर्मायकॉसिस आजार-कारणे,लक्षणे व शस्त्रक्रिया-उपचार या राष्ट्रीय चर्चासत्राचे(वेबीनार)आभासी पद्धतीने म्हणजेच झुम मिटींग ऑनलाईन व युट्युब लींक लाईव्ह च्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे.
उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या चेअरपर्सन डॉ.अर्चनाताई पाटील,चाकूरकर तर उद्घाटक म्हणून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.
जागतिक महामारी सदृश्य कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोवीड पॉझिटिव रुग्णांवर उपचार झाल्यानंतर सुद्धा त्या रुग्णांमध्ये म्युकॉर्मायकॉसिस या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.सदरील आजार हा अत्यंत गंभीर स्वरूप दर्शवित असुन त्यामुळे कोवीडोत्तर रुग्णांचा मृत्यूदर सुद्धा लक्षणीय दिसून येत आहे. तसेच शस्त्रक्रिया व उपचार केल्यानंतर शरीराचे ऊर्ध्वजत्रूगत भागातील अवयव आणि मुख्यत्वेकरून चेहरा,दात,नेत्र,घसा,कान,नाक या ठिकाणी येणारी विद्रुपता ही सुद्धा एक जटिल समस्या निर्माण झालेली आहे.
म्युकॉर्मायकॉसिस आजारासंबंधीची कारणे,लक्षणे व तथा आवश्यकतेनुसार पुढील उपचार-शस्त्रक्रिया यासंबंधीची अद्ययावत ज्ञान(माहिती)व अत्याधुनिक संशोधन वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स व पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना व्हावे. या उद्देशाने म्युकॉर्मयकॉसिस या आजारासंबंधीच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात प्रा.डाॅ.प्रशांत देशपांडे(शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अंबाजोगाई हे म्युकॉर्मायकॉसिस व कान-नाक-घसा संबंध या विषयावर; प्रा.डॉ.भास्कर केंद्रे(एम.आय.एम.एस.आर. मेडिकल कॉलेज,लातूर)हे म्युकॉर्मायकॉसिस व न्यूरोलॉजिकल संबंध या विषयावर; प्रा.डॉ.राहुल लटुरीया(एम.आय.डी.एस.आर.कॉलेज,लातूर)हे म्युकॉर्मायकॉसिस आणि दंत-मुख संबंध या विषयावर आणि डॉ.हेमंत बाविस्कर(संचालक, नेत्रायु आयुर्वेदिक्स हॉस्पिटल,जळगाव)हे म्युकॉर्मायकॉसिस आणि नेत्र संबंध या विषयावर मार्गदर्शन तथा शंका व प्रश्नांचे निरसन सुद्धा करणार आहेत.
सदरील चर्चासत्र वैद्यकीय,दंत,आयुर्वेद,होमिओपॅथी,यूनानी,नर्सिंग,फिजीओथेरपी,इत्यादी अभ्यासक्रमाच्या शिक्षक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी आणि खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स यांच्यासाठी खुले आहे.
तरी या चर्चासत्राचा आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समिती प्रमुख प्राचार्य डाॅ.दत्तात्रय पाटील,डॉ संजय कुलकर्णी,डाॅ.पूजा पाटील,प्रा.डाॅ.राजेंद्र धाटे आणि समन्वय समिती सदस्य डॉ.शिवलिंग सोनटक्के, पठाण,डाॅ.विजय केंद्रे,प्रा.डाॅ.रविकांत पाटील,डाॅ.मनोहर सूर्यवंशी तथा वेबिनार समन्वयक डाॅ.अविनाश जाधव यांनी केले आहे.