महसूलचे कर्मचारी सुटलेत सुसाट!! गरीब शेतकऱ्याला शेतात जायला मिळत नाही वाट !!!

महसूलचे कर्मचारी सुटलेत सुसाट!! गरीब शेतकऱ्याला शेतात जायला मिळत नाही वाट !!!

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे करडखेल येथील एका शेतकऱ्याने गेल्या वर्षभरापासून महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊन सुध्दा फायदा झाला नाही. शासनाने शेतकऱ्यांस वेगवेगळ्या गट नंबर मधील नकाशातील बंद केलेली पाऊलवाट जाण्या-येण्यासाठी खुली करून द्यावी. अशा पद्धतीचे धोरण घेतले असून सुद्धा करडखेलच्या शेतकऱ्याला वाट मिळवून देण्यासाठी महसूल कर्मचारी, अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप करत त्या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

 मौजे करडखेल येथील अल्पभूधारक शेतकरी रावसाहेब यशवंतराव कंजे यांनी उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देऊन आपल्या शेतात जाणारी, शासनाने नकाशात दाखवलेली परंतु बंद केलेली पाऊलवाट जाण्या-येण्यासाठी खुली करून द्यावी. अशी मागणी केली आहे. सदर निवेदनात ते म्हणतात की, माझी जमीन गट नंबर 341 क्षेत्र एक हेक्टर 77 आर असून मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्या शेतीत जाणारी नकाशातील पाऊलवाट दोन वर्षापासून बंद केलेली आहे. त्यामुळे माझ्या शेतीत जाणे येणे व शेतीची मशागत करणे कठीण झाले आहे. म्हणून तहसीलदार यांनी रस्ता खुला करुन द्यावा. अशी विनंती केली आहे. गेल्या अकरा महिन्यात शेतकऱ्याच्या अर्जाचा कसलाच विचार झाला नाही. व न्याय मिळाला नाही! उलट गेल्या अकरा महिन्यापासून त्या शेतकऱ्याची अवहेलना केली जात असल्याचा आरोपही केला आहे. यापूर्वी वेळोवेळी शेतकऱ्यांनी अर्ज दिले आहेत, मात्र त्या शेतकऱ्याच्या विरोधात काही शेतकरी वाट बंद करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या अडचणीमुळे तो अल्पभूधारक शेतकरी आपली शेती विकून जाईल. अशी धारणा ठेवून सदरील रस्ता बंद केला आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात वेळोवेळी महसूलच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे. मात्र त्या विनंतीला केराची टोपली दाखवत महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांनी सतत अन्याय चालवल्याचा ही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विनंती अर्ज केल्या नंतर तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन मंडळ अधिकारी हेर यांना पंचनामा करण्यासाठी नऊ महिन्यानंतर भाग पाडले. मात्र सदरील कर्मचाऱ्यांनी गोल गोल पंचनामा केला असून मुख्य रस्त्याच्या मागणीला बगल देऊन इतर खाजगी रस्ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नकाशातील रस्ता पाऊल वाट बंद केली आहे, त्यांना रस्ता बंद का केला? असा जाब विचारण्याची हिंमत महसूल कर्मचाऱ्यांमध्ये दिसत नाही. रस्ता बंद करणाऱ्यास नोटीस किंवा साधी विचारपूस सुद्धा केली नाही. उलट त्यांना अभय देऊन या तक्रारदार शेतकऱ्यांस ज्यादा सूचना दिल्या जात आहेत.

 30 मार्च 20 21 रोजी तहसिलदार यांनी उपविभागीय भूमिअभिलेख उदगीर यांना मंडळ अधिकारी हेर यांच्या अहवालानुसार जाय मोठ्यावर जाऊन, स्थळ पाहणी करून मोजणी करून नकाशाप्रमाणे खुणा व हद्द कायम करून तसा अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करावा. असे कळवले होते. तहसीलदार यांच्या पत्रात मोजणी अर्ज किंवा शेतकऱ्यांनी मोजणी फिस भरावे असा कोणताच उल्लेख नव्हता. मात्र दिनांक 19/5/ 2021रोजी उपविभागीय भुमिअभिलेख यांनी अर्जदारास पत्र देऊन सातबाराचा उतारा, चतु: सीमा सह मोजणी अर्ज, मोजणी फीस भरण्यास कळवले आहे.

 गटनंबर 341 ला जाणारे पाऊल वाट ही जवळपास दहा गट नंबर मधून जाणारी असल्याने दहा गट नंबर ची मोजणी फीस अल्पभुधारक शेतकरी भरू शकत नाही. गाव नकाशा तील पानंद रस्ते पाऊलवाटा या शासनाच्या मालकीच्या आहेत. त्या वाटा व रस्ते शासनाने जतन कराव्या लागतात. गरज भासल्यास शासनाने आदेश देऊन मोजणी करून न्याय द्यावा लागतो. जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये सदरील शेत रस्ते मोकळे करावे लागतात. मात्र असे असतानाही गरीब शेतकऱ्यास रस्ता मिळत नाही. मला माझ्या शेतीत जाण्यासाठी कमीत कमी चार फुटाचा तरी आणि तेही शक्य नसेल तर दोन फुटाची तरी वाट द्यावीअशीविनंती शेतकरीा करत आहे.वास्तविक पाहता नकाशात सव्वा आठ फुटाची वाट आहे! असे असताना देखील शेतकरी कळकळीची विनंती करून किमान जाण्या-येण्यासाठी तरी वाट मिळावी. अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे! आणि हेही देण्याचं शासकीय अधिकारी टाळाटाळ करत असतील तर शेतकऱ्यास  परिवारासह मरावे लागेल! याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. यामुळे सदरील शेत जमीन साठी जाणारा रस्ता 15 जून पूर्वी खुला करून द्यावा. अन्यथा अल्पभूधारक शेतकऱ्यास आत्महत्या करण्याची परवानगी देऊन उपकृत करावे! अशीही विनंती रावसाहेब यशवंतराव कंजे यांनी शासनास केली आहे.

चौकट……

मुंडे साहेब देव माणुस !

उदगीर तहसिलसाठी तहसिलदार म्हणुन व्यंकटेश मुंडे कार्यरत असतांना पंचेविस वर्षे,तीस वर्षाचे वाद मिटवून सामंजस्याने तालुक्यात अनेक शेतरस्ते मोकळे करून देऊन एक आदर्श निर्माण करून दिला होता!आता त्याच उदगीर तालुक्यात शेतकर्‍याला रस्त्यासाठी आत्महत्येची मागणी करावी लागतेय!हे फार मोठे दुर्दैव आहे!अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा वापर करून कामचुकार कर्मचारी आणि शासनाला व प्रशासनाला बदनाम करणार्‍या झारीतल्या शुक्राचार्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे!हे सरकार शेतकर्‍यांचे हित जपणारे आहे,सुदैवाने वरिष्ठ अधिकारी कर्तबगार आहेत,लक्ष देऊन शेतकर्‍याचा प्रश्न मिटवावा

व्यंकटराव पाटील अवलकोंडकर

शरद पवार विचार मंच,उदगीर

About The Author