कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही – माजी आ. भालेराव
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याने आणि देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून कार्यकर्ते येत आहेत. इतर पक्ष पाठिंबा देत आहेत. यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घाबरायचे कारण नाही. असे विचार भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केले.ते संयुक्त मोर्चा समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. भाजप पक्षाने दिलेला कार्यक्रम म्हणून संयुक्त मोर्चा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांना कॅबिनेट मंत्री पद दिल्यामुळे आणि ते भाजप सोबत आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे, या गोष्टीचा विचार करून काही कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भालेराव बोलत होते. कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण पक्षश्रेष्ठीकडे साकडे घालू, पार्टी हे आपले दैवत आहे. प्रत्येकाने पक्षा सोबत एकनिष्ठ राहावे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
या बैठकीसाठी भाजपाचे उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, ज्येष्ठ नेते धरमपाल दादा नादरगे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, ओबीसी मोर्चाचे संतोष केसगिर, महिला मोर्चाच्या उषा माने, शकुंतला पाटील, यांच्यासह कामगार मोर्चाचे दयानंद उबाळे, राम स्वामी कुसळकर, सुदर्शन माने, शिवशंकर धुपे, दत्ता केंद्रे, राजकुमार देशमुख, विधीज्ञ शाम कांबळे, रामेश्वर पवार, यांच्यासह भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख हेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले की, उदगीरच्या प्रतिनिधीला भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले हे आनंदाची गोष्ट आहे. यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघाचा निश्चित विकास होईल, अशी खात्री दिली.
या बैठकीचे प्रास्ताविक करताना तालुकाप्रमुख बस्वराज्य रोडगे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आल्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. एका अर्थाने आता आपल्याला विरोधक उरला नाही, याचा आनंद व्यक्त करण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
धरमपाल नादरगे यांनी सांगितले की, उदगीरच्या विकासासाठी नेतृत्व म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाळासाहेब पाटोदे यांनी केले.