देऊळवाडी येथे धाडसी चोरी अकरा लाख बावन्न हजारांचा ऐवज लंपास
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथील तीन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेऊन वाढवणा पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे.
वाढवणा पोलीस स्टेशन येथे नव्याने आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना चोरट्यांनी दिलेली ही सलामी असल्यामुळे तपासाचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. याप्रकरणी हाती आलेली माहिती अशी की, मौजे देऊळवाडी येथील रहिवासी असलेले हनुमंत देविदास केंद्रे यांचे वडील आजारी असल्यामुळे आणि बहिणीलाही काही पैसे द्यायचे असल्यामुळे त्यांनी आपल्या घरात काही सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आणून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश करून हनुमंत केंद्रे यांच्या घरासह त्यांच्या शेजारीपाजारी असलेले तीन घरे फोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यासंदर्भात हनुमंत केंद्रे यांच्या तक्रारीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु. र.न. 148/ 23 कलम 457, 380 भारतीय दंड विधान संहिता अन्वये अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच वाढवणा पोलीस स्टेशन चा प्रभार सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी स्वीकारला असून जणू चोरट्यांनी त्यांनाही सलामीच केली आहे की काय? अशी चर्चा वाढवणा परिसरात चालू आहे. देऊळवाडी परिसरात या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत.