अन् अहमदपूरच्या फुले महाविद्यालयातील जिजाऊ उद्यानात ‘वराह’ माता झाली प्रसूत..!

अन् अहमदपूरच्या फुले महाविद्यालयातील जिजाऊ उद्यानात 'वराह' माता झाली प्रसूत..!

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रसूतीच्या ‘वेणा’ सोसत सोसत… आपल्या अर्भकांना ‘जग दाखविण्या’ साठी एका ‘वराह’ मातेने येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘राजमाता जिजाऊ’ उद्यानातील कोपऱ्याच्या जागेची डोळस निवड करून आपल्या गोंडस पिलांना जन्म दिला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार व महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या व सहका-याच्या संकल्पनेतून महाविद्यालय परिसरात आकारास आलेल्या ‘राजमाता जिजाऊ उद्याना’ चा मनुष्य प्राण्यांबरोबरच पक्षांसह पशुधनालाही लाभ होत असल्यामुळे या जिजाऊ उद्यानाची सार्थकता सिद्ध झाली आहे.
मातृत्वाला अशक्य काहीच नसते. तिच्यात देवंपण असते. त्याबरोबरच मातृत्वामध्ये सहनशक्तीचे अमर्याद सामर्थ्य असते. म्हणूनच मातृत्वाला प्रसुतीच्या अनंत ‘वेणा’ सहन करण्याची क्षमता असते. याची जाणीव फक्त मातृत्वालाच प्रसूतीच्या वेळी होत असते.
अशीच एक ‘वराह’ माता आपल्या प्रसूतीच्या वेणा सुरू होतात न् होतात तोच महात्मा फुले महाविद्यालयात असलेल्या हिरवी गर्द, स्वच्छ आणि भरगच्च दाट झाडी असलेल्या वनराईची,व ऑक्सिजन पूरक असलेल्या ‘जिजाऊ उद्याना’ तील एका कोपऱ्यातील सुरक्षित जागा धरुन ‘बाळंत’ झाली. आणि आपल्या सात ते आठ पिलांना मनुष्य प्राण्यांचे ‘जग’ दाखविले.
आपल्या या ‘वराह’ पिलांसह ती ‘जिजाऊ उद्याना’त तब्बल दहा ते बारा दिवस तळ ठोकून आहे. तिला व तिच्या पिलांना पावसापासून संरक्षण देणे, तिच्या क्षुधापूर्तीच्या पूर्ततेची महाविद्यालयातील सेवक चंद्रकांत शिंपी, शिवाजी चोपडे आणि वामनराव मलकापुरे यांनी व्यवस्था करून आपली प्राणि मात्रावरील दया दाखवली. त्यांच्या या भूतदयेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वराह मातेची बाळे हळूहळू वाढत असून, ती सुदृढ दिसत आहेत. आता ही बाळे व ‘वराह’ माता जेव्हा या उद्यानातून बाहेर पडतील, तेव्हा या पालक कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांना हुरहुर लागल्याशिवाय राहणार नाही.

About The Author