आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देणार – क्रीडा व युवक कल्याणमंत्री – संजय बनसोडे
मुंबई (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सोय-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यात येईल. खेळाडूंना प्रशिक्षण ,मार्गदर्शनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे देण्यास प्राधान्य देणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण विभागाचा सविस्तर आढावा घेतांना ते बोलत होते .यावेळी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह क्रीडा विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते, ना.बनसोडे म्हणाले, ऑलिम्पिक आणि आशिया क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना सर्व प्रकारचे मार्गदर्शन,सहकार्य उपलब्ध करण्यात करून देण्यात येईल. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. खेळाडूंना केंद्रस्थांनी ठेवून विविध योजना राबविण्यात येणार असून सर्व स्तरावरील व सर्व खेळ प्रकारातील खेळाडूंना शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा नियमितपणे व वेळेत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या वतीने नुकतेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार लवकरात लवकर प्रदान करण्यात येणार आहेत.ऑगस्ट महिन्यातील एक तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटर विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून केंद्र व राज्य शासनाच्या खेळाडूं साठीच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही ना.बनसोडे यांनी यावेळी सांगितले.