क्रीडा शिक्षकांनी ऑलिम्पिक खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे – विभागीय शिक्षण उपसंचालक मोरे
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा गुणवंताची खाण आहे, क्रीडा शिक्षकांनी खेळाडू घडवताना ऑलिम्पिक खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करावे. शालेय वयात मुलांच्या जडणघडणीचा काळ असतो. त्या काळातच खेळाडूंची निवड करून त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन सुप्त कौशल्याचा विकास करावा, असे प्रतिपादन लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर पालिका प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रामदास कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, ज्येष्ठ कबड्डी पंच शंकरराव बुड्डे, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड,राष्ट्रीय खेळाडू महेश पाळणे यांची उपस्थिती होती.
क्रीडा क्षेत्रालाही लातुरची मोठी परंपरा आहे.हरिचंद्र बिराजदार, काका चव्हाण यांनी देश पातळीवर नाव कामावले आहे. जिथे प्रतिकुलता अधिक असते तिथेच गुणवत्तेचे पीक जोमात येते, त्यामुळे त्या गुणवत्तेला पूरक ही भूमी आहे. ज्यांना क्रीडा क्षेत्रात कौशल्य आहे अशा लोकांनी आपले कौशल्य पुढच्या पिढीला ज्या प्रकारे बॅटन पुढच्याच्या हाती दिली जातो, आणि त्यातून यश मिळते. हे लक्षात ठेवण्याचा मोलाचा सल्ला क्रीडा शिक्षकांना उपसंचालक मोरे यांनी दिला.
जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रशिक्षण शिबिरातील शिक्षकांना म्हणाले, विद्यार्थ्यांना खेळाप्रती अधिक सजग आणि मेहनती बनवा. मेहनत करणाऱ्याला यश नक्की मिळते. शिक्षकांनी राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडविणे हे लक्ष ठेऊन काम करावे. यावेळी रामदास कोकरे म्हणाले, क्रीडा चळवळीचा ध्यास घेऊन काम केले तर विजय नक्की आहे. शासनानेही खेळाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे दृष्टिकोण बदलला आहे. याचा लाभ खेळाडूंनी घ्यावा.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,पंच शंकर बुड्डे यांनीही मार्गदर्शन केले. दहा दिवस चाललेल्या या शिबिरातील प्रशिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुत्रसंचालन एन.आय. प्रशिक्षक लक्ष्मण बेल्लाळे यांनी केले. तर आभार क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी मास्टर ट्रेनर सुनिल तारे, अंकुश मंडलिक, रविंद्र गुडे, मनोजकुमार डिगे, प्रयागराज गरूड, रामदास बिरादार, अरविंद मुळे यांनी परिश्रम घेतले.