सकाळी बनवलेली वांग्याची भाजी का दिली नाही? म्हणून पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न!

सकाळी बनवलेली वांग्याची भाजी का दिली नाही? म्हणून पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न!

उदगीर (अॅड. एल पी उगिले) : पती-पत्नीमधील किरकोळ वादावरून चक्क पत्नीला रॉकेल टाकून पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्देवी घटना उदगीर तालुक्यातील हेर येथे घडली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील मौजे हेर येथील पीडित महिला फरजाना शादुल शेख (रा.हेर) यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की, तिचा नवरा शादुल शेख याचे इतर दुसऱ्या महिने सोबत संबंध आहेत. तसेच तो सतत दारू पीत असतो. लग्न झाल्यापासून तो पीडित विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. दिनांक 8 जून रोजी फिर्यादीने सकाळी आठ वाजता स्वयपाक केला, आणि पतीला जेवणाची विनंती केली. मात्र पती न जेवता तो घरातून बाहेर निघून गेला. त्यानंतर तो चक्क रात्री साडेनऊ वाजता घरी आला.

 घरी आला त्यावेळी तो दारू पिलेल्या अवस्थेत होता.त्याने जेवनासाठी सकाळी केलेली वांग्याची भाजी जेवायला दे. असे त्यांनी पत्नीला सांगितले. मात्र सकाळी केलेली भाजी संपल्यामुळे पत्नीने भाजी संपली असे सांगितल्यानंतर, मला तीच भाजी हवी आहे. असे म्हणून त्याने शिवीगाळ करून वाद घालायला सुरुवात केली.

 या वादाच्या रागातच चुली जवळ ठेवलेल्या रॉकेलच्या बाटली मध्ये असलेले रॉकेल फिर्यादीच्या अंगावर टाकले, आणि काडी ओढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पीडित महिला ही 25 टक्के भाजली असून शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून धावत येऊन आग विझवली. फिर्यादीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं. 211 /21 प्रमाणे कलम 307, 498(अ), 506, 504 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी डेनियल जॉन बेन, ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील घोडके हे अधिक तपास करत आहेत.

 केवळ भाजीच्या कारणावरून पत्नीस जिवे मारण्याच्या उद्देशाने रॉकेल टाकून पेटवून दिल्यामुळे हेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंचवीस टक्के भाजलेल्या फिर्यादीस लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी शादुल शेख यास उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

About The Author