पर्यावरण दिनानिमित्त धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वनौषधींची लागवड
उदगीर (प्रतिनिधी) : सन 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी साजरा केला जातो.धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व वैयक्तिक अंतर राखून वनौषधी उद्यानामध्ये वनस्पतींची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.दत्तात्रय पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.आर.आर.मुगळे (सहयोगी अधिष्ठाता,पशुवैद्यकीय विद्यापीठ उपकेंद्र, उदगीर), डॉ.संजय बिरादार (निवासी वैद्यकीय अधिकारी,सामान्य रुग्णालय,उदगीर) डाॅ.विश्वास साळुंके (विभाग प्रमुख, शल्यतंत्र विभाग, पशुवैद्यकीय विद्यापीठ, उपकेंद्र,उदगीर), मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, उपाध्यक्ष डाॅ. राहुल आलापुरे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सहयोगी अधिष्ठाता डाॅ.मुगळे म्हणाले की, जैवविविधतेचे संतुलन ही काळाची गरज असून निसर्गाची किमया सर्वांनी समजून घेऊन स्वच्छ परिसर, हरित परिसर, सुंदर परिसर ही संकल्पना पूर्णत्वास न्यावी. जेणेकरुन स्वस्थ व निरोगी व्यक्ती-समाज-राष्ट्र निर्मितीसाठी मदत होईल.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील म्हणाले की, आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या गुडुची, अश्वगंधा, शतावरी, यष्टिमधु,पिंपळी, भल्लातक, हरितकी, इत्यादी वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करून रोगप्रतिकारशक्ती वाढवता येऊ शकते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.एस.आर.श्रीगिरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.शितल घोरबांड यांनी केले. यावेळी रोगनिदान विभाग प्रमुख डॉ. नारायण जाधव, डॉ. दीपिका भद्रे, डाॅ.अस्मिता भद्रे तसेच कार्यालयीन व रुग्णालयीन कर्मचारी तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.