उदगीर शहरात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर – ना. संजय बनसोडे

उदगीर शहरात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर - ना. संजय बनसोडे

लातूर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी आणून शहरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेचा 335 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. तसेच शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेंतर्गत संजय नगर येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह आणि म्हाडा कॉलनी येथे उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह व अंतर्गत सिमेंट रस्त्याचा लोकार्पणप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. उदगीरचे उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद प्रशासक सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवर यांच्यासह कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगरसेवक मनोज कपाळे, श्रीरंग कांबळे, समीर शेख, राजकुमार भालेराव, फय्याज शेख, बबिता भोसले, रेखा कानमंदे आदी यावेळी उपस्थित होते.

उदगीर शहरातील नागरिकांना रस्ते, वीज, आरोग्याच्या सुविधा देण्यावर विशेष भर आहे. त्याचबरोबर विविध समाजाच्या लोकवस्तीमधील पायाभूत सुविधांविषयक प्रश्न सोडविण्याचा प्राधान्य देण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजनेंतर्गत शहरात 8 सभागृह आणि रस्ते, नालीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी संजय नगर आणि म्हाडा कॉलनी येथील सभागृहाचे लोकार्पण होत असून उर्वरीत कामेही लवकरात लवकर पूर्ण होतील, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच शहरात विविध ठिकाणी मोहल्ला क्लिनिक उभारण्यासाठी प्रयत्न आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय आढावा घेवून आवश्यक पायाभूत सुविधांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही ना. बनसोडे यांनी केल्या.

उदगीर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 15 फुटी पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, तसेच पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठीही अतिरिक्त 50 ते 60 लक्ष रुपयांचा नधी देणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जळकोट शहरातही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच उदगीर व जळकोट शहरात समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author