लेकरांना बघून तृप्तीची ढेकर देते ती आई असते – प्रो. डॉ. रामकृष्ण बदने
उदगीर : (एल.पी.उगीले) : मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिथी देवो यामध्ये प्रथम स्थानी येते ती माता, माय, जननी, आई तीच आपल्या मुलांवरती मूल्यात्मक संस्कार करत असते. समाजामध्ये सदगुणांची पेरणी करण्याचे काम आईच्याच माध्यमातून होत असते. संसारिक जीवनामध्ये सर्वजण सुखाचे सोबती असतात पण एकमेव आई अशी असते जी लेकरांना बघून तृप्तीची ढेकर देत असते, असे मत प्रो. डॉ. रामकृष्ण बदने यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहि:शाल शिक्षण केंद्र आयोजित व्याख्यानादरम्यान दुसरे पुष्प गुंफताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सताळा येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन सुडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के हे होते. यावेळी मंचावर शिवलिंगप्पा जळकोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे, शाळेचे मुख्याध्यापक संजय मळभागे, नरसिंह माळगे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बदने म्हणाले, आईच्या संस्कारामुळेच श्यामचा साने गुरुजी झाला. अनेक महापुरुषांच्या पाठीमागे आईच असते. वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही एक चिंताजनक बाब आहे. आई-वडिलांच्या सेवेतच स्वर्गसुख आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र तिरूके म्हणाले, आई लेकरांना ज्ञानामृत पाजवीत असते, लेकरांच्या अंत:करणाचा ठाव घेत असते. त्यामुळे आई समजून घेतली पाहिजे. आईशी प्रामाणिक राहिलात तरच जीवनात यशाची शिखरे सर कराल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय बहि:शाल शिक्षण केंद्र समन्वयक डॉ. गौरव जेवळीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गुरुडे यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री. संजय मळभागे यांनी मानले.