शहरातील मुख्य चौकात रांगोळी काढून योग दिन साजरा
राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा अनोखा अभिनव उपक्रम
लातूर (प्रतिनिधी) : प्रभावी आरोग्यमंत्र ठरलेल्या योगाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग-दिनी योगाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या भव्य, सुबक, मनमोहक रांगोळ्या शहरातील मुख्य चौकाचौकात काढण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मध्ये योग साधना शिबिराचे आयोजन केले जाते. या वर्षी स्कूलने कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाइन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात योग प्रशिक्षक डॉ ब्रिजमोहन दायमा व सरिता दायमा यांनी शिबिरातील सहभागीना प्राणायाम, योगासन व सूर्यनमस्कार यावर मार्गदर्शन केले व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त विविध सूक्ष्म प्राणायम व योगासनाचे प्रशिक्षण दिले.
तथापि स्कूलने योग विषयक जनजागृती करण्याचे ठरवले व चौका-चौकात रांगोळी काढण्याचा अभिनव उपक्रम राबविला. रांगोळीतून मात्र लाईफ माय योगा, सदृढ भारतासाठी निरोगी शरीर हाच खरा दागिना हा संदेश देत रोगमुक्त जीवनासाठी कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली. चित्रकला शिक्षक हणमंत थडकर, अमोल देशमुख व माधव जोशी यांनी रांगोळ्या काढल्या प्राचार्य कर्नल एस ए वरदन यांचा मार्गदर्शनाखाली शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी संस्था अध्यक्ष शैलेश लाहोटी सचिव आशिष बाजपाई स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी आदींनी कौतुक केले.
कोरोना विषाणूचा प्रमुख वाहक मनुष्य आहे जर आपण मनुष्य म्हणून जागरूक जीव बनलो आणि सर्वांच्या आयुष्यात योगाचा अंश आणला तर अशा अनेक संकटे, महामारी वर मात करणे आपल्या हातात आहे कर्नल एस ए वरदन म्हणाले.