एलसीबीची धडाकेबाज कामगिरी चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकलीसह, आठ लाख 32 हजाराचा ऐवज जप्त

0
एलसीबीची धडाकेबाज कामगिरी चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकलीसह, आठ लाख 32 हजाराचा ऐवज जप्त

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला ज्येष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले रुजू झाल्यापासून धडाकेबाज मोहीम सुरू झाली आहे. तपासाला गती आली असून अनेक गुंतागुंतीचे गुन्हेही उघड झाले आहेत. मोटर सायकल चोरी, जबरी मोबाईल चोरी, लॅपटॉप चोरी अशा विविध गुन्ह्यातील चोरट्यांची टोळी अटक करून त्यांच्याकडून तब्बल आठ लाख 32 हजाराचा ऐवज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून मोटार सायकल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल झाला होता. तसेच इतर पोलीस स्टेशनला देखील मोटर सायकल, मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते, वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदारा कडून मोटार सायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोटर सायकल व मोबाईल चोरी करून ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणाऱ्या आरोपींची टोळी निष्पन्न करून, टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन खालील आरोपींना चोरी केलेला 1 लॅपटॉप, 11 मोटरसायकली व 21 मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले.अक्षय प्रभाकर कणसे,(वय 28 वर्ष, राहणार वाल्मिकी नगर,गल्ली नंबर 3, लातूर), समाधान बाळासाहेब जाधव, (वय 20 वर्ष, राहणार काडगाव ,तालुका जिल्हा लातूर सध्या राहणार एस एस लॉजच्या बाजूस, एक नंबर चौक, लातूर), सद्दाम हुसेन शेख,(वय 24 वर्ष, राहणार पळसप, तालुका जिल्हा धाराशिव. सध्या राहणार माऊली नगर पाखरसांगवी, लातूर),राम उर्फ लखन सुधाकर संदीले, (वय 24 वर्ष राहणार, सरस्वती शाळेच्या पाठीमागे, प्रकाश नगर, लातूर),महेश नामदेव नरहरे, (वय 21 वर्ष, राहणार महाळग्रा तालुका चाकूर, जिल्हा लातूर. सध्या राहणार सोना नगर, लातूर), आशिष गोविंद पवार, (वय 24 वर्ष, राहणार माळुंब्रा, तालुका औसा जिल्हा लातूर सध्या राहणार सोना नगर, लातूर).
यांना दिनांक 30/01/2024 रोजी त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखीन तीन साथीदारासह लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. नमूद आरोपीनी विविध गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 1 लॅपटॉप, 21 मोबाईल व 11 मोटारसायकली असा एकूण 8 लाख 32 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाईत पोलीस ठाणे एमआयडीसी, पोलीस ठाणे शिवाजीनगर, पोलीस ठाणे गांधी चौक,पोलीस ठाणे विवेकानंद, पोलीस ठाणे भादा,तसेच पोलीस ठाणे कळंब जिल्हा धाराशिव येथील 1 गुन्हा असे एकूण 8 मोटरसायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाले असून चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी करीत आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून मोटार सायकल व मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, राहुल कांबळे, नितीन कठारे, संतोष खांडेकर,नकुल पाटील यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!