भारतीय सैन्यदलात शौर्य आणि सेवेला अधिक प्राधान्य – कर्नल सचिन रंदाळे
लातूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जगामध्ये भारतीय सैन्य दल हे अत्यंत प्रभावशाली दल म्हणून सर्व परिचित आहे. भारतीय सैन्य दलात शौर्य आणि सेवेला अधिक प्राधान्य असते असे प्रतिपादन डिफेन्स अकॅडमी पुणेचे मेंटॉर कर्नल सचिन रंदाळे यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील विज्ञान शाखेतर्गत करियर कौन्सिलिंग फॉर एन. डी. ए. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अॅड. राजशेखर बिडवे हे होते तर विचारमंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले आणि गणित विभाग प्रमुख डॉ. सुजित हंडीबाग यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कर्नल सचिन रंदाळे म्हणाले की, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज नवनवीन अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आपल्या देशात सुरू केले जात आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एनडीए सारख्या अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासक्रमाला आपल्याला जाण्याची उत्तम संधी आहे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहून देश सेवेमध्ये सामील झाले पाहिजे. भारतीय सैन्य दलामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान केला जातो हे सांगून त्यांनी भारतीय सैन्यदल हे देशाच्या साधन संपत्तीचे नुकसान न होऊ देता दुश्मनाशी लढते. दैनंदिन जीवनामध्ये नीतिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. “मरना जरुरी है, लेकिन दुश्मन को पहिले मारना है” या वाक्याने त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी केले. प्रमुख अतिथीचा परिचय राजशेखर बिडवे यांनी करून दिला.
याच कार्यक्रमात बीएस्सी. प्रथम वर्षातील विद्यार्थी ममता आपटे, जान्हवी टीकांबरे, आणि प्रतिभा सारगे यांनी Marathwada mathematical society तर्फे घेण्यात येणाऱ्या “20th Annual Seminar Competition उत्कृष्ठ सादरीकरण केले त्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार आणि प्रमाणपत्र देऊन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी मनोगतपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनी केले तर आभार डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी मानले. या कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम बिराजदार, राम पाटील, जगन्नाथ येचवाड, भीमाशंकर सुगरे यांनी परिश्रम घेतले.