सांप्रदायिक संस्कृती मनामनामध्ये रुजली पाहिजे : ना. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : मानवता हा एकच धर्म समजुन आपण सर्वांनी एकत्रित येवून सर्वधर्म समभाग, बंधुभाव समाजात रुजविण्याचे काम करावे. महाराष्ट्राच्या मातीतून कलाकार तयार होतात असे मोठे कलाकार अशा भजन स्पर्धेमधुन घडत असतात. शेल्हाळ गावाला आज प्रतिपंढरीचे स्वरूप आले असुन गेल्या ७ वर्षापासून मानव सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत राज्यस्तरीय सामुहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते ही बाब कौतुकास्पद आहे. आपली ही सांप्रदायिक संस्कृती मनामनामध्ये रुजली गेली पाहिजे असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर तालुक्यातील शेल्हाळ येथील मानव सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत राज्यस्तरीय सामुहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक भजन स्पर्धेच्या उद्धाटनाप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. भास्कर महाराज सांडोळकर, उद्धाटक ह.भ.प. प्रशांत महाराज खानापुरकर. हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून पंडित कल्याण गायकवाड, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी जि.प. सभापती बापूराव राठोड, सरपंच विमलबाई चिखले, शेल्हाळचे सुपुत्र डाॅ.अनिल कांबळे,
तोंडचिरचे सरपंच सुदर्शन पाटील, तहसीलदार विकास बिरादार, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, भगवानराव पाटील तळेगावकर, सुरेश लांडगे, किरण लांडगे, उमाकांत तपशाळे, विवेक सुकणे, सायस दराडे, उदय मुंडकर, भिम लांडगे, वसंत पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, मागील ५०० वर्षापासुनचे आपल्या सर्व भारतीयांचे स्वप्न होते की, प्रभु श्रीराम यांचे भव्य दिव्य मंदिर आयोध्येत उभारावे, ही आपली ईच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीला पूर्ण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जाती धर्माला सोबत घेवुन विकास करणार असुन आपला देश २०४७ पर्यंत विकसीत झाला पाहिजे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीला आपण साथ द्यावी. असे आवाहन ना.बनसोडे यांनी केले. यापुढे आपण सर्वांनी धार्मिक कार्यक्रमाला बळ देवुन पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्या. या स्पर्धेसाठी २५ जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम वारकरी सांप्रदायाने केले. मानव सेवा केली तर ती ईश्वर सेवा केल्यासारखी आहे असे ही मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत जाधव यांनी केले.कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त, वारकरी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.