महाविकास आघाडीच्या बैठकीकडे आतनुरकरांनी फिरवली पाठ
जळकोट (प्रतिनिधी) : 15 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या वतीने उदगीर विधानसभा मतदारसंघात विविध प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग मिळावा म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनता दल, आम आदमी पार्टी इत्यादी घटक पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढून बैठका घेऊन लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकाकडे सर्वसामान्य जनतेने पाठ फिरवल्याचे चित्र आतनूर गावामध्ये पाहायला मिळाले. बैठकीला आलेल्या पाहुण्यापेक्षा उपस्थित लोकांची संख्या कमी असल्याने नेत्यांचा हिरमोड झाला, अशीही चर्चा गावात चालू होती. काल-परवापर्यंत उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या कार्याचे कौतुक करणारी मंडळी आज शासनाच्या विरोधात बोलत असलेले पाहून लोक अचंबित झाले होते. तसेच या कार्यकर्त्यांनी रोज एक सांगितले तर आपण काय ऐकावे? त्यापेक्षा आपण आपापल्या मनाप्रमाणे करावे. असाच निर्धार लोकांनी केल्याचे चित्र आतनूर परिसरात पाहायला मिळत होते. अनेक गावातून अशाच पद्धतीची स्थिती असल्याची चर्चा तालुकास्तरावरील मोठ्या गावात चालू असल्याचेही बोलले जात आहे.