अहमदपूरात भाजपाचे चांगभले, अनेक मान्यवर भाजपाच्या वाटेवर?
दिलीपराव देशमुख, किरण उटगे, आयोध्द्या केंद्रे भाजपात प्रवेश करणार!!
लातूर (एल.पी.उगीले) : अहमदपूर बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख, औसा येथील माजी नगराध्यक्ष किरणआप्पा उटगे आणि अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापाती आयोध्याताई केंद्रे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी, समर्थक दि. २५ जून २०२१ शुक्रवार रोजी लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालय, पीव्हीआर चौक येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा भाजपाचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर आणि औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात माजी सभापती दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्ष किरणआप्पा उटगे आणि माजी सभापती आयोध्याताई केंद्रे यांचा त्यांच्या समर्थकासह भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी आमदार विनायकराव पाटील, शिवाजीराव पाटील कव्हेकर, पाशा पटेल, बब्रूवान खंदाडे, जिप अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर आ. रमेशअप्पा कराड यांनी लातूर जिल्हयातील भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याच्या हेतूने जिल्हाभरातील पक्षांतर्गत असलेले मतभेद, गटतट राहणार नाहीत या पध्दतीने पक्षाची बांधणी करत आहेत. भाजपा बद्दल आपुलकी जिव्हाळा असणाऱ्या अनेकांना पक्षात घेवून जिल्हयात भाजपा एक नंबरचा पक्ष कशा पध्दतीने राहील यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम होत आहे. दिलीपराव देशमुख, किरण उटगे आणि आयोध्या केंद्रे यांच्या पक्षप्रवेशाने त्या त्या भागात पक्षाला निश्चितपणे बळकटी मिळणार आहे.