गतवर्षीचा पीकविमा व प्रोत्साहनपर अनुदान मिळावे

गतवर्षीचा पीकविमा व प्रोत्साहनपर अनुदान मिळावे

स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषदेची मागणी

बोंबा मारो आंदोलनाचा इशारा

औसा (प्रतिनिधी) : गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, कर्जमाफीच्या वेळी घोषित केल्याप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. दि.१५ जुलै पर्यंत पीकविमा व अनुदान मिळाले नाही तर बोंबा मारो आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शासनाच्या धोरणानुसार ३३ टक्के नुकसान झालेल्या पिकाला विम्याचे कवच देण्यात आले आहे.विमा कवच असल्याने मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कंपनीकडे हप्ता जमा केलेला आहे. गतवर्षी औसा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले.नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे भरपाई मागितली. कंपनीने शासकीय पंचनामे ग्राह्य धरून सरसकट मदत न देता बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांना भरपाई दिली. यामुळे सामान्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहिला आहे.या शेतकऱ्यांना तात्काळ तात्काळ भरपाई मिळणे गरजेचे आहे.

राज्यातील आघाडी सरकारने सत्तेवर येताच कर्जमाफीची घोषणा केली होती.थकित शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते.त्यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. हे अनुदान अद्यापही प्राप्त झालेले नाही. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गतवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.त्याचाही फायदा झाला नाही.

सरकारने पीकविमा भरपाई आणि प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे.दि.१५ जुलै पर्यंत या रकमा जमा झाल्या नाहीत तर दि.१६ जुलै रोजी किल्ला मैदान ते तहसील कार्यालय यामार्गे बोंबा मारो आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे, बहुजन रयत परिषदेचे राजीव कसबे, संपतराव गायकवाड, दगडू बरडे,मुजफ्फर अली इनामदार, अमोल चव्हाण, सुरेश भोसले, सौदागर वगरे नदीम सय्यद आदींसह असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

About The Author