राष्ट्रीय परिषदेचे डॉ. सी. आर.बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद,मुंबई यांच्या सौजन्याने आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ” आझादी का अमृत काल: उपलब्धी,संधी आणि आव्हाने” या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.यामध्ये विविध तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या अर्थव्यवस्थेतील बदलावर आपले विचार व्यक्त केले.
या परिषदेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड येथील आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ.सी. आर.बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ.विजयकुमार पाटील,अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एल. एच.पाटील,सी.सी.शेठ महाविद्यालय गुजरात येथील डॉ. जगतराव धनगर, डॉ.व्ही. व्हीं. सुकाळे, संस्थेच्या कोषध्यक्षा मृदुलाताई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर आणि परिषदेचे समन्वयक डॉ.मदन शेळके उपस्थित होते. उद्घाटप्रसंगी डॉ.सी. आर.बाविस्कर यांनी आझादी का अमृत काळातील आतापर्यंतच्या शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत शैक्षणिक धोरण कसे बदलत गेले आणि ते काळानुसार बदलणे देखील आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर यांनी परिषदेचा उद्देश व कार्यक्रमाच्या रूपरेषाविषयी माहिती दिली.परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.गणेश बेळंबे यांनी केले तर आभार परिषदेचे समन्वयक डॉ.मदन शेळके यांनी मानले. या परिषदेसाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.