आई-वडिलांच्या सेवेत यशस्वी जीवनाचे सामर्थ्य – मा.श्री. गोविंदरावजी भोपणीकर
देवणी (प्रतिनिधी) : आई वडिलांच्या सेवेमध्ये यशस्वी जीवनाचे सामर्थ्य असून जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो तो जीवनामध्ये कधीही अपयशी होत नाही असे प्रतिपादन मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब यांनी केले. कै. रसिका महाविद्यालय देवणी येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विकास कुलकर्णी (मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजनी) उपस्थित होते. डॉ. विकास कुलकर्णी यांनी वाटाड्या या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती यावेळी दिली. तसेच आपण नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक झाले पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. वाटाड्या या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रात 6000 लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळवून दिला असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ शिक्षणातून मिळणाऱ्या नोकरीवर अवलंबून राहता शेतीपूरक उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. विकास कुलकर्णी यांनी यावेळी केले. त्यावेळी कै. रसिका महाविद्यालय व वाटाड्या संस्थेमध्ये शैक्षणीक, सामजिक व व्यवसायिक उपक्रमाबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुदर्शन पेडगे, प्रा. डॉ. महादेव टेंकाळे यांची उपस्थिती होती. यावेळी शेलापागोटेचा कार्यक्रम घेण्यात आला. स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गोपाल सोमानी यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.