जलयुक्त शिवार चळवळीत ग्रामस्थ आणि युवकांचा सहभाग महत्वाचा रासेयो संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी
लातूर (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून पाणी व्यवस्थापनासाठी जलयुक्त शिवार चळवळीची आपण सुरुवात केली आहे या चळवळीत ग्रामस्थ आणि युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड सलग्नित राष्ट्रीय सेवा योजना, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय, जवळा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष युवक शिबिर मौजे जवळा बु. येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रत्नाकर बेडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. नरेश पिनलकर, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. किसनाथ कुडके यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. करजगी म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे गडकोट किल्ल्यावरील जल व्यवस्थापन वैशिष्ट्यपूर्ण असे होते. छत्रपती शिवराय हे कृषिरक्षक होते. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा असे संबोधले जाते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक थोर महात्म्ये आणि राष्ट्रपुरुषांच्या विचारधारेवर चालणारे सुजान, सक्षम आणि सुदृढ तरुण तयार करण्याचे काम करीत आहे. तरुणाने समाजातील अनेक प्रश्न, आव्हाने यांचा सूक्ष्म अभ्यास करून गाव, शहर विकासाकरिता संघटन शक्ती दाखवावी असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. नरेश पिनलकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण हे देशाची संस्कृती, देशाची भाषा, देशाचा भव्य दिव्य इतिहास जतन करणारे आहे. पारंपरिक शिक्षणातील साचेबद्धपणा कमी करून भारतीय ज्ञान व्यवस्था अधिक बळकट करणारे आहे. यातून कौशल्याधिष्ठित, आत्मनिर्भर आणि विकसित भारताकरिता तरुणांची पिढी तयार होईल असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. सुभाष बेंजलवार म्हणाले की, स्व भान ठेवून योजना आखणारी आणि बेभान होऊन काम करणारी पिढीच देशाचे भविष्य आहे. उद्याचा भारत अधिक सुजलाम् आणि सुफलाम् करण्यात रासेयो स्वयंसेवक यांचा वाटा मौलिक असणार आहे. समाजसुधारणेच्या कार्यासाठी धडपडणारी ही पिढी नक्कीच देशाला उज्ज्वल भविष्य देतील असे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. रत्नाकर बेडगे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे ही विद्यार्थ्यांची आयुष्य घडवणारी शिबिरे आहेत. यात विद्यार्थ्यांना त्याग, समर्पण, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, मानवता, विज्ञाननिष्ठा, श्रमसंस्कार अशी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवीत असते. समाजऋण आणि राष्ट्रऋण फेडण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या या युवकांच्या हाती सर्वार्थाने देशाचे भविष्य आहे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवप्रसाद डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा भिसे आणि धनश्री भंडे यांनी केले. तर आभार रामकृष्ण सुरडकर यांनी मानले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.