दहशत निर्माण करण्यासाठी धारदार तलवार बाळगणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर (एल.पी. उगिले) : गावात आणि परिसरात आपली दहशत निर्माण झाली पाहिजे, लोकांनी आपल्याला घाबरले पाहिजे. अशा उद्देशाने विनापरवाना धारदार तलवार घरी बाळगून कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आरोपी विरुद्ध वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 73/ 24 कलम 4 , 25 शस्त्र अधिनियम सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाढवणा पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेळगाव ता. चाकूर जि. लातूर येथील इरफान मनुसाब अत्तार (वय 36 वर्ष) याने बेकायदेशीर रित्या धारदार लोखंडी तलवार स्वतःच्या कब्जात बाळगून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून गुन्हा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय दळवी पाटील हे करत आहेत.